आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:उद्धव ठाकरेंनी आता दिल्लीत जावे; पवारांसाेबत ‘यूपीए’चे नेतृत्व करायला हवे, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेताना पत्रकार राजू परुळेकर. छाया : रवी खंडाळकर - Divya Marathi
खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेताना पत्रकार राजू परुळेकर. छाया : रवी खंडाळकर

‘दिल्ली आता मुर्दाड झाली आहे. देशातल्या राजधानीत राजकीय स्वातंत्र्य संपले आहे. ‘विरोधक मुक्त भारत’ हा एकमेव उद्देश समोर ठेवून हे सरकार काम करतंय. समोर कोणी नेता नाही अशी परिस्थिती आहे. संविधानावर असाच हल्ला हाेत राहिला तर देशात स्वातंत्र्य राहणार नाही. अशा परिस्थितीत देशाला टिकवण्यासाठी भाजपच्या विरोधात असणाऱ्या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन यूपीएची पुनर्बांधणी करावी. त्याचे नेतृत्व शरद पवारांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांनी करावे. महाराष्ट्रात भाजपविरोधात सरकार चालवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतमिा आता राष्ट्रीय झाली आहे. त्यामुळे त्यांनीही दिल्लीत जायला हवे. केंद्रातील ही सत्ता उलथून टाकण्यासाठी शरद पवार व उद्धव ठाकरेंनी विराेधी आघाडीचे नेतृत्व करायला हवे. महाराष्ट्रातील या नेत्यांची आता देशाला गरज आहे,’ असे मत शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी आैरंगाबादेत व्यक्त केले.

शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या ‘जय भीम फेस्टिव्हल’चे रविवारी हाॅटेल अजंटा अॅम्बेसेडरमध्ये खासदार राऊत यांच्या हस्ते उद‌्घाटन झाले. त्यानंतर प्रसिद्ध पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत राऊत यांनी राजकीय प्रश्नांना सडेताेड उत्तरे दिले, मात्र त्यांचा सगळा राेष भाजप व माेदी सरकारवरच हाेता. ‘साै दाऊद, एक राऊत’ अशी टॅगलाइन या मुलाखतीला देण्यात आली हाेती.

राऊत म्हणाले, ‘या सरकारच्या विरोधात अनेकांच्या मनात खदखद आहे, मात्र ती बाहेर दिसत नाही. जनता सध्या शांत आहे. आणीबाणीच्या वेळीदेखील अशीच परिस्थिती होती. नंतर मात्र तेव्हाच्या जनतेने मतपेट्यातून रोष दाखवला. तशीच जनतेच्या मनातील ही खदखद २०२४ मध्ये नक्कीच बाहेर पडेल. विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे, मात्र ताे यशस्वी होणार नाही. जगात कोणाही अमरपट्टा घेऊन आले नाही. संजय राठाेड यांच्या राजीनाम्याबद्दल बाेलताना ते म्हणाले की, संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची खरतर गरज नव्हती. अद्याप तपास संपलेला नाही. गुन्हेगार कोण आहे हे अजून स्पष्ट नाही. तरी सुद्धा तपासात अडथळा नको म्हणून त्यांनी राजीनामा दिला, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जागी उद्या दुसराच पुतळा असेल
‘भाजपच्या काही नेत्यांना आमच्याशी बोलावे वाटते, मात्र कधी आपण सीसीटीव्हीतून दिसू याची त्यांना भीती वाटते. मोगल काळापासून दिल्ली हे दिलदारांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र आता दिल्ली मुर्दाडांचे शहर झाले आहे. आता तर नवीन संसद तयार केली जाते आहे. पंडित नेहरूंंपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानांपर्यंत अनेक मोठे नेते या संसदेत आले. या इमारतीतल्या महापुरुषांच्या प्रतिमा कायम इतिहास आणि त्यांच्या संघर्षाची आठवण करून देतात. मात्र तो इतिहास पुसून टाकण्याचे काम सुरू आहे. उद्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जागी कोणाचा वेगळा पुतळा असला तर मला आश्चर्य वाटणार नाही,’ असा टाेला राऊतांनी माेदींना लगावला.

राजभवनाचे अध:पतन
राज्यपालांच्या मुद्द्यावर राऊत म्हणाले, ‘राज्यपाल हे दिल्लीचे एजंट असतात हे जगजाहीर आहेत. मात्र आज एवढे राजभवनाच अध:पतन कधीच झाले नाही. कोश्यारी यांच्या विचारांचे सरकार सध्या राज्यात नाही म्हणून त्यांनी असहकाराची भूमिका घ्यावी हे योग्य नाही. आपण काय वागतोय हे त्यांना कळाले पाहिजे. हे घटनात्मक आहे का? अशा ‘कळसूत्री’ची देशाला गरज नाही. असे असेल तर राष्ट्रपतींचीदेखील गरज नाही. आज आठ महिने झाले १२ आमदारांची यादी दिली आहे त्याचे काय झाले,’ याची आठवणही त्यांनी राज्यपालांना करून दिली.

काँग्रसेने त्याग करायला हवा
‘राहुल गांधी प्रामाणिक आहेत. ते देशाशी खोटे बोलत नाहीत. मात्र हे सरकार काँग्रेस फोडण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावते. भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी यूपीएची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून त्याग करायला हवा,’ असे सांगतानाच जोपर्यंत शरद पवार आणि आमच्यासारखी माणसे आहेत तोपर्यंत राज्यातील सरकारला धाेका नसल्याचा दावा राऊत यांनी केला.

डेलकरांना महाराष्ट्र न्याय देईल
दादरा-नगर हवेलीचे खासदार माेहन डेलकर हे मुंबईत येऊन आत्महत्या करतात. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भाजपच्या लोकांनी देशभरात दहशत निर्माण केली आहे. मात्र महाराष्ट्रात तरी मला न्याय मिळेल, माझ्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जाईल, अशी डेलकर यांची अपेक्षा हाेती. त्यांच्या सुसाईड नाेटमध्ये अनेक भाजपच्या नेत्यांची नावे आहेत. त्याचा मुंबई पोलिस तपास करेल, असे राऊत यांनी सांगितले.

दलित नेतेच जबाबदार
दलित कार्यकर्त्यांची कामे होत नाही, अशी खंत आयाेजक चेतन कांबळे यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केली हाेती. त्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन जे दुकान आणि राजकारण सुरू आहे त्याला जबाबदार कोण आहे. जर आज दीनदलितांचे काम होत नाही, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची कामे होत नसतील तर त्याला कोण जबाबदार आहे? डॉ. बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करणारे दलित नेतेच जबाबदार आहेत. अनेक वर्षे ते मंत्री होताहेत, संसदेत जातात तरीदेखील समस्या कायम आहेत,’ असा टाेला राऊत यांनी रामदास आठवलेंना उद्देशून लगावला.

बातम्या आणखी आहेत...