आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मविआ'ची वज्रमूठ सभा:पंतप्रधानांची पदवी विचारल्यास 25 हजारांचा दंड लावला जातो! त्यांच्याकडे अशी कोणती पदवी? - उद्धव ठाकरेंचा PM मोदींना सवाल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''पंतप्रधानांची पदवी विचारली तर 25 हजारांचा दंड लावला जातो. पंतप्रधानांकडे अशी कोणती पदवी आहे. पंतप्रधान ज्या शाळेत शिकले त्या शाळेला अभिमान का वाटू नये. पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेतला की काय? असा जोरदार हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला. यासह हल्ली डाॅक्टरेटही विकत घेता येते. काही जण पाण्याचे इंजेक्शन घेवून फिरतात असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

हिंदू पंतप्रधान असताना आक्रोशाची वेळ

''जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल तेव्हा निवडणुका उंबरठ्यावर आले असे समजा. सावरकर गौरव यात्रा काढा अजून काढा. जनआक्रोश मोर्चेही काढले जात आहेत. तो मुंबईत निघाला व शिवसेनाभवनपर्यंत आणला. जगातील सर्वात शक्तिमान हिंदु नेता पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना जनआक्रोश करायची वेळ आली असेल तर त्या नेत्याची शक्ति काय कामाची?'' असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभेत पंतप्रधान मोदींवर केला.

..तर तेव्हा समजा निवडणुका आल्या

उद्धव ठाकरे म्हणाले, जे भाजपला जमले नाही ते मविआने करून दाखवले. करायचे काही नाही नुसते कोंबडे झुंजवत बसायचे हे भाजपचे काम आहे. जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल तेव्हा निवडणुका उंबरठ्यावर आले असे समजा.

हिंदुत्वाचे मोजमाप करण्याचा अधिकार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, मी काॅंग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले मग भाजप महेबुबा मुफ्ती आणि मुफ्ती मोहमंद यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी घालून बसला मग त्यांनी काय सोडले होते. हिंदुत्वाचे मोजमाप घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही म्हणाल तोच देशप्रेमी आणि देशद्रोही ही जर तुमची मस्ती असेल तर ती आम्ही गाडण्यासाठीच वज्रमुठ आवळली आहे.

पंतप्रधानांची पदवी विचारली तर दंड

उद्धव ठाकरे म्हणाले, कर्ज काढून अनेकांनी शिक्षण घेतले. पण हल्ली असे म्हणतात डाॅक्टरेटही विकत घेता येते. काही जण पाण्याचे इंजेक्शन घेवून फिरतात. अनेक जण असे आहेत की, पदव्या दाखवूनही किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला मागितली तर पंचवीस हजारांचा दंड लावला जातो. पंतप्रधानांकडे अशी कोणती पदवी आहे. पंतप्रधान ज्या शाळेत शिकले त्या शाळेला अभिमान का वाटू नये. पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेतला की काय?

उद्धव ठाकरे म्हणाले, मविआचे सरकार तुम्हाला पसंत होते की, नाही. महाविकास आघाडीचे सरकार ज्या पद्धतीने पाडले ती पद्धत तुम्हाला मंजूर आहे का? शिवरायांचे, संभाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि सरकार पाडण्यासाठी पाठीत मागून खंजीर खुपसायचा. शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस सत्तेसाठी एकत्र आलो, पण सत्ता गेल्यानंतरही आम्ही घट्टपण एकत्रच आहोत.

मिंध्यांचे काय चाटतात?

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहांनी माझ्यावर आरोप केले. सत्तेसाठी तळवे चाटल्याची भाषा केली. मलाही शिवसेनाप्रमुखांची भाषा मला येते पण ती त्यांनाच शोभत आहे. आम्ही तळवे चाटत होतो तर तु्म्ही मिंध्यांचे काय चाटताय?

आम्हालाही प्रतिमा आहे

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणतात मेरी प्रतिमा खराब काम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मग आम्ही म्हणतो आम्हालाही प्रतिमा नाही का? आम्ही काही म्हटले तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना बोलले तर ओबीसींचा अपमान! विरोधकांना त्रास दिला जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकश्या लावल्या जात आहेत. चारीत्र्यहनन केले जातेय, तुरुंगात टाकले जातेय. भ्रष्ट म्हणून हिनवले जात आहे.

संगमासोबत सरकार स्थापले

उद्धव ठाकरे म्हणाले्, ज्या संगमासोबत तुम्ही सरकार स्थापन केले त्याच संगमावर तुम्ही भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते मग मी म्हणतो की, अमित शहाजी तुम्ही संगमाचे काय चाटत आहात? दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात अशी भाजपची निती त्या पक्षात भ्रष्ट्राचाराने बरबटलेले लोक आहेत. या पक्षाचे नाव भ्रष्ट्राचार पक्ष नाव ठेवा. भाजपच्या व्यासपीठावर आधी साधू दिसायचे. आता संधीसाधू आहेत. तो जमाना वेगळा होता तो जमाना अटलजी, शिवसेनाप्रमुखांचा होता.

पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून दाखवा

उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही संपवायची. दुसरा पक्ष संपवण्यासाठी लोकांना तुरुंगात टाकायचे काम भाजप करीत आहे. सावरकरांची गौरव यात्रा काढा पण त्यांचे स्वप्न सिंधूपासून हिंदी महासागरापर्यंत भारत हे स्पप्न पुर्ण करून दाखवा. जमीन दाखवायची असे तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवा अन्यथा गप्पा मारू नका. सरदार वल्लभभाई पटेलांचे गुजरातेत सर्वात मोठे स्मारक आहे. ते होते म्हणूनच मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले मग त्यांच्यासारखी हिम्मत पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखवा.

पंतप्रधानांवरही वचक जनतेचा हवा

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप देशात घातक प्रकार करू इच्छीते. न्यायव्यवस्था ती आपल्या अधिकारात आणू इच्छीते. ती त्यांची वाटचालही आहे. ज्या दिवशी न्यायव्यवस्थेवर भाजपचा प्रभाव असेल त्या दिवशी लोकशाही संपली म्हणून समजा. इस्त्रायली जनता पेटून उठली तेव्हा तेथील पंतप्रधानही झुकले होते. बे..बे.. करणारी लोकशाही नको. पंतप्रधानांवरही वचक जनतेचा हवा.

सध्याच्या सरकारवर जनता खूश नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, घटना पायदळी तुडवणाऱ्यांना पायदळी तुडवू. मराठवाड्यात शेतकरी, कामगारांची अवहेलना सुरू आहे. कामगारांसाठी केंद्राने मालकधार्जीणा कायदा आणला. तो आम्ही महाराष्ट्रात लागू करू दिला नाही पण मिंधे सरकार तो कायदा महाराष्ट्रात आणू पाहत आहे. कामगार, शेतकऱ्यांच्या, जवानांच्या कष्टावर देश उभा आहे. देशाला दिशा देण्याचे राजकारण्यांचे काम पण या वर्गाच्या हिताचे निर्णय घेतले जात नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही. या सरकारवर जनता खूश नाही.

मी घरी बसून कोरोनात यशस्वी काम केले

उद्धव ठाकरे म्हणाले,​ आम्ही फसवा - फसवीचे धंदे केले नाही कधी करणार नाही. पिककर्ज माफ केले त्याचा शेतकऱ्यांना आमच्या सरकारच्या काळात लाभ झाला आता तो मिळत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढतोय माझ्यावर तेव्हा टीका झाली. जे काम कोरोनाकाळात मी घरून केले ते सत्ताधाऱ्यांनी गुवाहाटी, सुरतला जावून केले नाही.

तोतयेगिरीचे सरकार सुरू ​​​​​​

उद्धव ठाकरे म्हणाले,​ तोतयेगिरीचे सरकार सुरू आहे. आम्ही भाजपला खांद्यावर घेवून फिरवले. महाराष्ट्र त्यांना स्वीकारत नव्हता. शिवसेनाप्रमुखांच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी रक्त सांडले ते देशासाठी पण तेच आज आपल्याला लाथ देत आहेत. ''सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नाव, चिन्ह चोरले. माझे वडीलही चोरले. पण मुख्यमंत्र्यांच्या वडीलांना काय वाटत असेल..? ते म्हणत असतील की, दिवटं कारटं..त्याला बापही दुसऱ्यांचा लागतो.'' मी सांगतो की, मी माझ्या वडीलांचे नाव सोडणार नाही. माझ्या वडीलांच्या नावाचा तुम्ही वापर करून घेतला.

वाचू का? म्हणणारे निवडणुकीत वाचणार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, मी आज सांगतो की, मी माझ्या वडीलांचे नाव घेतो तुम्ही मोदींना महाराष्ट्रात आणा आणि महाराष्ट्रात निवडणुका जिंकून दाखवा. उद्धव ठाकरेंना एकटा पाडायचे कारस्थान तुम्ही केले. पण काॅंग्रेस, राष्ट्रवादीने साथ दिली. तुम्ही काय चोरणार, माझे काय घेणार माझ्या आईवडीलांचे आशीर्वाद आणि आई जगदंबेचे आशीर्वाद चोरू शकत नाही. तुम्ही (एकनाथ शिंदे) सभेत खुर्च्या भाड्याने आणू शकता. भाड्याने आणलेले लोक शेवटपर्यंत तुमच्या सभेत बसत नाही. त्यांना विचार दुसऱ्यांचे लागतात, सभेत वाचू का..वाचू का..म्हणता..जनता जेव्हा मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही वाचणार नाही.

गटारगंगा खपवून घेतली नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, राजेश टोपेंनी कोरोनात खाते चांगले सांभाळले. त्यांना आत्ताही औषधांची नावे विचारा ते सांगतील पण आत्ताच्या आरोग्यमंत्र्यांना काही विचारायची गरज उतर नाही ​अशी कामगिरी! छत्रपतींचे नाव घेतात पण सर्वांचा छळ करता अशी यांची निती. एक गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतात. एक आमदार सुषमा अंधारेंना घाणेरड्या शब्दात बोलतो. हे जे बोलत आहे त्यांची शिवसेनेत हिंमत नव्हती ते बोलले असते तर लाथ मारून बाहेर काढले असते. अशी गटारगंगा शिवसेनेत कधीही खपवून घेतली नाही व खपवून घेणार नाही. ​​​​

भाजपला नामषेश केल्याशिवाय राहणार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना फक्त सत्ता हवी. जे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिले ते माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. ते मी स्पष्ट शब्दात अमित शहांना सांगितले होते. आजही तुम्ही शिवसेना फोडली पण डोक्यावर दगड घेवून बसला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, छातीवर दगड ठेवला. मिंध्यांचे ओझे घेवून तुम्ही निवडणुका लढवणार आहात का हे मी भाजपला विचारतो. नड्डांनीही म्हटले की, देशात दुसरा पक्ष राहणार नाही. पण मी म्हणतो की, भाजप आम्ही नामषेश केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमचे हात घ्यायला निघाला. अर्थात ती वृत्ती तुमची आहे. मोठी केलेली माणसे गेली पण मोठी करणारी माणसे आजही माझ्यासोबत आहेत.

मराठवाड्याची मुख्यमंत्र्यांनी उपेक्षा केली - अजित पवार

''मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांची उपेक्षा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. हा मराठवाड्यातील जनतेचा अपमान आहे असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अजित पवारांनी केला. यासह महाराष्ट्रातील सध्याचे सरकार नंपुसक आहे हे आम्ही म्हणत नाही. सर्वोच्च न्यायालाची टिप्पणी आहे असे वक्तव्यही त्यांनी केले.

स्थिर सरकारची महाराष्ट्राला गरज

अजित पवार म्हणाले, प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना नाव दिले, ते बाळासाहेब ठाकरेंनी धनुष्यबान चिन्हासह महाराष्ट्रभर पोहचवले. कायद्याचा आणि घटनेचा आदर सर्वांनी केला पाहिजे. त्यांला तिलांजली देण्याचे काम केले. आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. असे जर सर्व राज्यात घडले तर देशात स्थिरता येणार नाही. राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार हवे.

मुक्तिसंग्राम दिनासाठी केवळ 13 मिनिटे दिली!

अजित पवार म्हणाले, शिंदे- फडणवीस सरकारने मराठवाड्यातील जनतेचा अपमान केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी केवळ 13 मिनिटे वेळ दिला.

कितीही गौरव यात्रा काढा फरक पडणार नाही - अशोक चव्हाण

अशोक चव्हाण म्हणाले, आजची विराट सभा पाहिल्यानंतर कितीही गौरव यात्रा काढल्या तरी काहीही फरक पडणार नाही. विराट सभा जनतेच्या मनातील प्रतीक आहे. ही मन की बात नाही दिल की बात है. महाविकास आघाडी देवगिरी किल्ल्यासारखी ताकवाद मजबूत झाली. ती कुणीही फोडू शकत नाही. मराठवाड्यातील लोकांच्या भावना आहेत की, मविआचे सरकार जायला नको होते. आमच्यात किरकोळ मते होती ती आम्ही सावरून घेत होतो.

सरकार फोडले, चिन्हही ते घेवून गेले

अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात भाजपला रोखायचे असेल तर तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही ही भूमिका आम्ही सोनीया गांधींना पटवून दिली त्यानंतर मविआ स्थापन केली. अडीच वर्षांच्या कारकिर्दीला बोट लावण्याचे काम केले. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आमदार गेले. पक्ष फोडला. चिन्हही घेवून गेले.

पक्षांतर कायदा गुंडाळून सत्ता स्थापन

अशोक चव्हाण म्हणाले, लोकशाहीला मारक फोडाफोडी होत असेल व पक्षांतर बंदी कायदा गुंडाळून राज्यात सत्ता आणली जात आहे. हे महाराष्ट्रात कधी घडले नाही. हे महाराष्ट्रात आता घडले ही शोकांतिका आहे. राहुल गांधींनी फक्त संसदेत प्रश्न विचारले होते. अदानींना वाचवण्याचे काम केंद्र सरकार का करीत आहे हे त्यांनी विचारले पण आवाज दाबण्यात आला.

लोकशाहीची विटंबना सुरू आहे

अशोक चव्हाण म्हणाले, राहुल गांधींना घर खाली करायला लावत आहे. लोकशाहीची विटंबना होत आहे हा प्रश्न केवळ राहुल गांधींपुरता नाही. जे बोलत आहे त्यांचा आवाज दाबला जात आहे. जे राहुल गांधी, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडू शकते ते आपल्याबाबतीत घडू शकते. लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला एकत्र यायला हवे.

उद्धव ठाकरेंसारखा भला माणूस पाहीला नाही

अशोक चव्हाण म्हणाले, राजकारण थोडे बाजूला ठेवू पण मला सांगावे वाटते की, उद्धव ठाकरेंसारखा एवढा भला माणूस मी पाहीला नाही. महाराष्ट्रातील अनेक प्रश्नावर निर्णय घेताना कधीही वेगळी भूमिका घेतली नाही. आम्हाला अडचणी होत्या. राजेश टोपेंचे कोरोनातील काम महत्वाचे होते. त्यांच्या नेतृत्वात चांगले काम आम्ही केले. उद्धव ठाकरेंचे कौतुक करायला हवे.

मुक्तिसंग्रामाबाबत ठराव घेतला नाही

अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. मराठवाड्याच्या कामासाठी पैसा द्यावा हे आम्ही सांगितले त्यावर ठाकरेंनी समिती नेमून 75 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली. आम्ही सरकारमधून गेल्यानंतर सध्याच्या सरकारकडून निधी सोडा पण विधीमंडळात साधा मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे अभिवादनाचा करणारा ठरावही घेतला नाही. स्वातंत्र्यसैनिकांची उपेक्षा सध्याच्या सरकारने केली. हा अस्मितेचा विषय होता.

मराठवाड्याने काय पाप केले?

अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्याने काय पाप केले होते. निर्णय बेभान प्रसिद्धी वेगवान, फक्त प्रसिद्धीवरच शिंदे फडणवीस सरकारचा भर, राज्याचे कर्ज सात लाख कोटींवर गेले आहे. बेरोजगारी, महागाईचे विषय सोडून गौरव यात्रा सुरू आहे. सर्व महापुरुषांचा आम्ही सन्मान करतो पण मराठवाडा तहानलेला आणि भुूकेला आहे त्याकडे लक्ष हे सरकार देत नाही.

मविआने सर्वात चांगले कोरोनाचे हाताळले - थोरात

काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही सर्व एकत्र आलो. किमान समान कार्यक्रमातून आम्ही शेतकऱ्यांचे हित साधण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कोणताही त्रास न होता कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेतला. एक महिन्यात सर्वांच्या खात्यात दोन लाख रुपये पाठवले. कोरोनाचे संकट आले तरीही आम्ही पन्नास हजारांच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकल्या होत्या. कोरोना काळात आम्ही पूर्ण पारदर्शकता होती.

नाफेडची कांदा खरेदी सुरू नाही

बाळासाहेब थोरात म्हणाले, सध्याच्या सरकारने नाफेडची कांदा खरेदी अजून सुरू केली नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले हा मविआ आणि सध्याच्या सरकारमधला फरक आहे. केंद्रसरकार सुडाची भावना बाळगत आहेत. लोकशाहीवर आघात होत असताना राहुल गांधींनी आवाज उठवला. अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेमका संबंध काय? राहुल गांधींनी विचारल्यानंतर हे लोकसभा सभागृहातील कामकाजातून काढून टाकले.

सत्ताधाऱ्यांच्या पायाखालील वाळू सरकली - धनंजय मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले, मराठवाड्याच्या मातीतून वज्रमुठ आवळली जाते. मविआ एकत्रित लढणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकारचे काम महाराष्ट्राचा विकास करणे, अर्थसंकल्पातील आश्वासने पाळण्याचे काम सरकारचे आहे पण दिलेले शब्द पाळले जात नाही.

..तर मातीत गाडू

धनंजय मुंडे म्हणाले, सरकारला चोर म्हटले तर सदस्यत्व रद्द होते. घरी पोलिस येतात, राहत इंदोरी यांनीही सरकारला चोर म्हटले तर त्यांच्या घरी पोलिस आले होते. महाराष्ट्रातील सरकार गुजरातसाठी की, महाराष्ट्रासाठी? महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना मातीत गाडू.

पालकमंत्री लोकांना दारू पाजत सुटले - चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपविण्यासाठी प्रयत्न केले, हे तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री हे लोकांना दारू पाजत सुटले आहे. हे 40 गद्दार पु्न्हा निवडून येणार नाही. महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरेच प्रयत्न केले, असा हल्लाबोल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

जलील खासदार झाले अन् दंगली सुरू झाल्या

चंद्रकांत खैरे म्हणाले, आजची सभा होऊ नये यासाठी पोलिसांवर नागपूरचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. शिवसेना फोडण्याचं काम फडणवीसांनी केलं असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं. सावरकरांना भारतरत्न देत नाही, पण त्यांच्या नावाने यात्रा काढता असा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीसांवर केला.

तत्पूर्वी अजित पवार यांचे शहरात आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भाजप व शिंदेंच्या शिवसेनेविरोधात ठाकरे गटासह राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने वज्रमुठ आवळत मराठवाड्यात एल्गार पुकारला आहे.