आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील विकास प्रकल्प रखडले:उद्धव ठाकरेंनी केलेल्या घाेषणा कागदावरच; औरंगाबाद-शिर्डी विमानसेवेची प्रतीक्षाच

औरंगाबाद / प्रवीण ब्रह्मपूरकर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात परभणी, उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, हिंगोलीत हळद प्रक्रिया उभारण्याची घाेषणा केली हाेती. वर्षभरानंतरही या घोषणा कागदावरच आहेत.औरंगाबाद ते शिर्डी विमानसेवा सुरू करण्याची घाेषणा करूनही विमान सुरू झाले नाही, अशी माहिती पर्यटन अभ्यासक जसवंत सिंग यांनी दिली.

माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, सफारी पार्कच्या निविदा निघाल्या आहेत. त्याचे काम सुरू आहे. रस्त्यासाठी ३१७ कोटींचा निधी मंजूर असून सध्या २२ रस्त्याची कामे सुरू आहेत. शंभर कोटी रुपयांची ही कामे आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत आहेत. बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे.

२०० मेगावॅट साैरऊर्जेची याेजना ठप्प : मराठवाड्यात शेतकऱ्यांना वीज मिळावी यासाठी २०० मेगावॅट साैरऊर्जेचा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पुढे काहीच काम झाले नाही. परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी अद्याप जागा निश्चित झाली नाही. सध्या परभणी जिल्ह्याच्या अधिष्ठातापदी डॉ. संजय मोरे यांना पदभार देण्यात आला आहे. ते नांदेडच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

शिंदेंनीही केली हाेती घाेषणा : मराठवाड्यात सर्वाधिक हळदीचे उत्पादन हिंगोली जिल्ह्यात होते. त्यामुळे वसमतमध्ये हळद प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प कागदावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील हिंगोली जिल्ह्यात हळद प्रक्रिया प्रकल्पाबाबत घोषणा केली होती.

उस्मानाबादला १.२० काेटी

उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि भूमिगत गटार योजनेसाठी १६८ कोटी रुपयांची घोषणा केली होती. याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक कोटी वीस लाखांचा निधी मिळाला आहे. सहा कोटी रुपयांची यंत्रसामग्रीचा प्रस्ताव असून त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही. भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने त्यासाठी निधी मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...