आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर येथे शिवगर्जना अभियान अंतर्गत ठाकरे गटाच भव्य मेळावा तापडिया नाट्य मंदिरात पार पडला. परिस्थिती कोणतीही असो, ठाकरे कुटुंबाच्या पाठिशी सदैव राहू, असा निर्धार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोहिमेत केला. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत आघाडी यांनी शिवगर्जना अभियानास गर्दी केली.
मुंबईच्या माजी महापौर पेडणेकर यांनी सांगितले की, आता हेवेदावे विसरून गद्दारांना गाडण्यासाठी सज्ज व्हा. उद्धव ठाकरे हे वादळ आता कुणीही रोखू शकत नाही. झेरॉक्स कॉपी झेरॉक्स असते. त्यामुळे मूळ शिवसेनेसोबत कायम राहा, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले. धनुष्यबाण चिन्ह चोरले, उद्या मशाल चिन्ह चोरण्याचा डाव सुरू आहे, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आपले चिन्ह आणि पक्ष कायम असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
माजी आमदार अनिल कदम म्हणाले, शिवसैनिक हा आदेशाचे पालन करणारा आहे. त्यामुळे येणाऱ्या संकटात हा निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे कुटुंबांच्या पाठिशी कायम असल्याने विरोधकही हतबल झाले.
युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांनी सांगितले की, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासैनिक भक्कमपणे काम करत आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसैनिक आणि युवासैनिक निवडणुकीत चुणूक दाखवेल.
माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी केंद्र आणि राज्यसरकार वर टीका केली. ईडीच्या धास्तीने भाजपमध्ये गेलेले आता कसे चांगले झाले, याचे उत्तर द्या. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन डॉ.मुंदडा यांनी केले.
जिल्हा युवाअधिकारी हनुमान शिंदे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिवसेना मराठवाडा सचिव ऍड. अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाममामा सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे आदींची उपस्थिती होती.
महागाईच्या विरोधात निदर्शने
गॅसमध्ये झालेल्या दरवाढीचा निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संभाजीनगर येथे तीव्र निदर्शने करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.