आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 दिवसांची शिक‌वणी बाकी:यूजीसीचा नियम 90 दिवसांचा, प्रत्यक्षात फक्त 73 दिवस वर्ग ; 22 डिसेंबरपासून परीक्षा सुरू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

९० दिवसांच्या शिकवणीनंतर परीक्षा घ्यावी, असे यूजीसीचे निर्देश आहेत. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीजी परीक्षांचे वेळापत्रक ७३ दिवसांनीच जाहीर केले असून २२ डिसेंबरपासून ११० केंद्रांवर १६,९१३ विद्यार्थी परीक्षा देतील. यंदा पदवी निकालास विलंब झाल्यामुळे विद्यापीठाच्या पीजी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले होते. ९ जुलै आधीच प्रवेश होतील, असे गृहीत धरून शैक्षणिक वेळापत्रकात ९ जुलै ते १९ ऑक्टोबरपर्यंत (९० दिवस) शिकवणी पूर्ण होईल, असे नमूद आहे.

त्यानंतर ४ ते ३० नोव्हेंबरदरम्यान परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेला अनेकदा मुदतवाढ दिली की, १९ सप्टेंबरला स्पॉट अॅडमिशन दिले. तेव्हापासून जर ‘इफेक्टिव्ह टीचिंग पीरियड’ गृहीत धरला, तर २१ डिसेंबरपर्यंत ७३ दिवसच होतात. ७४ व्या दिवसापासून पीजीच्या १६,१९३ विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ घेतली जाणार आहे. बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम सत्राच्या परीक्षाही २२ डिसेंबरपासूनच सुरू होणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान अशा दोन सत्रांत पेपर होतील. व्यावसायिक पदवी व पदव्युत्तरचे वेळापत्रक नंतर जाहीर होईल.

सुट्यांत गेले १९ दिवस १९ सप्टेंबरच्या ‘स्पॉट’ नंतर २० पासून शिक‌वणी सुरू झाली असे म्हटले तर सप्टेंबरमध्ये ११ दिवसांची शिक‌वणी झाली. ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या १० दिवसांपेक्षा अधिक सुट्या होत्या. त्यामुळे या महिन्यात फक्त १९ दिवसांची शिकवणी झाली. नोव्हेंबरमध्ये गुरुनानक जयंतीसह चार रविवार होते. त्यामुळे या महिन्यात २५ दिवस क्लासेस झाले. डिसेंबरचे तीन रविवार वगळले तर १८ दिवसच क्लासेस होतात. या ‘वर्किंग डेज’ची बेरीज केली तर ७३ दिवसच भरतात.

सर्वाधिक परीक्षार्थी विज्ञानचे सर्वाधिक ९,८०२ विद्यार्थी एमएस्सीची परीक्षा देणार आहेत. कला व सामाजिकशास्त्र शाखेतून एमएची ३,८२५ विद्यार्थी परीक्षा देतील. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील एमकॉमची ३,२८६ जण परीक्षा देतील. ४ जिल्ह्यांत कॉपीसह विविध गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी १० भरारी पथकांची नेमणूक केली आहे.

आमच्या रेकॉर्डनुसार ९० दिवस झालेत यूजीसीने पूर्ण वर्षभराची शिकवणी १८० दिवसांची व्हावे, असे म्हटले आहे. प्रथम सत्राचे ९० दिवस पूर्ण झालेच पाहिजेत असे नाही. तरीही आमच्याकडील माहितीनुसार ९० दिवसांची शिकव‌णी पूर्ण झाली. त्यामुळेच वेळापत्रक जाहीर केले. - डॉ. श्याम शिरसाट, प्र-कुलगुरू

बातम्या आणखी आहेत...