आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैनिकासाठी सर्वात वाईट हवामान म्हणजे ३५ अंश फॅरेनहाइट तापमान आणि धुवाधार पाऊस. किंवा खंदक गुडघाभर पाण्यात बुडालेले आणि पाणी बर्फाळ असते तेव्हा. अशा परिस्थितीत जगणे ही एक कला होते. येथे लोक खऱ्या अर्थाने जगण्यासाठी संघर्ष करतात आणि देवाशी संवाद साधतात. आघाडीच्या जवळ असलेले सर्व सैनिक आपापल्या खंदकात असे बसतात, जणू ते त्यांचे छोटेसे घर आहे. त्यांच्याकडे स्लीपिंग बॅग, शस्त्रे आणि अन्न असते, परंतु काही सैनिक त्यांच्यासोबत पुस्तके ठेवतात. काही वेळा ते त्यांच्या मुलांनी काढलेली चित्रे भिंतींवर लावतात.
काही वेळा शत्रू इतका जवळ येतो की, सैनिकांना दुर्बिणीशिवायही तो समोर दिसतो. पण, काहीही झाले तरी मोर्चे सोडू नका, अशी सूचना सैनिकांना दिलेली असते. शत्रूला तुमची जमीन काबीज करू देऊ नका, ही युद्धाची मूळ कल्पनाही यातच निहित आहे. अशा परिस्थितीत गोळीबार सुरू होतो तेव्हा सैनिक कशाचाही आडोसा घेऊ शकत नाही, त्याच वेळी शत्रू पुढे म्हणजे आपल्या हद्दीत येऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागते. पण, गोळीबार सुरू होताच पुढे कूच करा, असा असा युद्धाचा नियम आहे.
मी माझे सांगतो. एकदा आमच्या ठिकाणावर अनेक तास बाॅम्बवर्षाव झाला. आमचा खंदक हादरला. वरून माती आमच्या अंगावर पडू लागली. स्फोटाच्या आवाजामुळे काही क्षण आम्हाला काहीही ऐकू आले नाही. पण, आम्ही हे सर्व अनुभवले आहे, म्हणजे याचा अर्थ आम्ही भाग्यवान आहोत, कारण तो बॉम्ब आमच्यापासून सुमारे ३० फूट दूर पडला असतो. आपण देवाचे आभार मानतो, कारण पुढच्या वेळी आपण कदाचित इतके भाग्यवान नसू. प्रत्येक स्फोटाबरोबर लोखंडाचे तुकडे हवेत उडतात. १२० मिमी माॅर्टरचा मोठा तुकडा बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घुसू शकण्याइतका बळकट असतो. पण, त्याहून वाईट आपल्या शरीरात घुसणारे छोटे, धारदार तुकडे. म्हणूनच मी - एक रायफलमॅन असूनही वैद्यकीय कामही करतो - अंतर्गत रक्तस्राव होऊ शकेल अशी कोणतीही जखम नजरेतून सुटू नये म्हणून जखमेची काळजीपूर्वक तपासणी करतो.
खंदकाजवळ एखादा मोठा प्रोजेक्टाइल पडला तर सैनिक जमिनीत गाडले जातात. ते गुदमरण्याआधी त्यांच्या एखाद्या साथीदाराला ढिगारा खणून त्यांना बाहेर काढावे लागते. लक्षात ठेवा, स्फोट जितकी जमिनीवर हादरवतो त्यापेक्षा अधिक तो जमिनीच्या खाली जाणवतो. कारण स्फोटाच्या लहरी एक व्हॅक्यूम तयार करतात आणि तुमच्या कानावर खूप दबाव टाकतात. हे डोक्याला मार लागल्यासारखे असते. म्हणूनच आम्हाला आपल्या हातात मशीन गन घेऊन झोपायला शिकवले जाते, जेणेकरून जिवंत गाडले गेलो तर तिच्या मदतीने बाहेर येता यावे. गोळीबार अनेक तास चालू राहू शकतो आणि तो संपल्यावर तुम्हाला भीती वाटणे थांबलेले असू शकते. आपल्याला वाटते की, आपण आता याला सरावलो आहोत. तुम्ही खंदकातून बाहेर पडून पाहता की, सूर्य तळपत आहे आणि पक्षी गात आहेत, जणू हे सर्व एक वाईट स्वप्न होते.
शांततेच्या काळात धैर्य आणि शौर्य हे शब्द निरर्थक वाटतात. त्यांचा खरा अर्थ रणांगणात लक्षात येतो. भीती कोणालाही वाटू शकते, परंतु आपल्या भीतीवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो आणि कधीही हार मानत नाही तोच धैर्यवान असतो. आमचे शत्रू चकित झाले असल्याचे आम्हाला माहीत आहे. हे कसे शक्य आहे? आम्ही आमच्या सर्व शक्तिनिशी त्यांच्यावर हल्ला केला, सर्व काही जाळून राख केले, परंतु त्यांचे सैन्य अजूनही जमिनीवर आहे, असे आम्ही त्याच्या रेडिओ इंटरसेप्ट्सवर नियमितपणे ऐकतो. त्याचे कारण आहे आमच्यासारख्या सैनिक, जे आघाडी सांभाळण्यासाठी जमीन खोदून त्यात राहायला तयार आहेत, कारण स्वतंत्र असणे आणि आपल्या देशाचे रक्षण करणे हे जगण्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. (मुळात युक्रेनियन भाषेत लिहिलेला हा लेख लेखकाच्या पत्नीने न्यूयॉर्क टाइम्ससाठी अनुवादित केला आहे.)
येगोर फिरासोव्ह लेखक युक्रेनियन सैन्यात रायफलमन म्हणून कार्यरत आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.