आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज औद्योगिक वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत भंगार गोदाम उभारले असून तेथील टाक्यांत असलेल्या रसायनांची दुर्गंधी परिसरात पसरते. त्याचबरोबर शिवार रस्त्यात भंगार सामान पसरवून ठेवले जाते. त्याचा परिसरातील उद्योगांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे एकाही भंगार गोदामाला एमआयडीसी प्रशासनाने परवानगी दिली नसल्याचे अधिकारी सांगतात. शिवाय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची आणि अग्निशमन विभागाची परवानगी न घेताही गोदाम उभारले आहेत.
उन्हाळ्यात अनेकदा या गोदामांना आग लागते. त्याची झळ लगतच्या उद्योगांना बसते. या गोदामात प्लास्टिकच्या मोठ्या टाक्यांतील रसायनांची दुर्गंधी पसरली. त्याचबरोबर गोदामातील सामान शिवार रस्त्याच्या मधोमध पसरलेले असते. त्याचा कामगार, उद्योजकांना त्रास होतो. मात्र, गोदामधारकांचे राजकीय नेते व गुंडांशी संबंध असल्याने उद्योजक त्यांची तक्रार करण्यास धजावत नसल्याचे खासगीत सांगतात. अशा प्रकारचे गोदाम एनआरबी ते ऋचा कंपनी या मुख्य मार्गावर, एमआयडीसी ते साजापूर मार्ग, साजापूर ते करोडी मार्गावर, त्याशिवाय जोगेश्वरी, पंढरपूर, रांजणगावात मोठ्या प्रमाणावर आहेत.
गोदामचालक परराज्यांचे वाळूजमध्ये सुमारे २५० अनधिकृत भंगार गोदाम आहेत. बहुतांश गोदामांचे चालक परराज्यातील असल्याचे कामगारांनी सांगितले. गोदामात काम करणारे कामगारही परराज्यातील आहेत. या गोदामांची नोंद परिसरातील एकाही ग्रामपंचायतीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. काही गोदामांच्या भिंती सुमारे १५ फुटांपर्यंत उंच आहे. त्यामध्ये गोदामात नेमके काय केले जाते याची माहिती बाहेर समजत नाही, असेही काही कामगारांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.