आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रस्ते महामार्ग’चे पत्र:जालना रस्त्यावरील पाच पूल पाडले तरच अखंड पूल शक्य, विमानतळासमोरील पूल रद्द करणे गरजेचे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना रोडवर अखंड उड्डाणपूल करण्यासाठी विमानतळासमोर मंजूर झालेला उड्डाणपूल अडथळा ठरत आहे. अखंड पुलासाठी आधी हा पूल रद्द करावा लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गाने जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असून त्याबाबत उत्तर आलेले नाही. दुसरीकडे या मार्गावरील सध्या असलेल्या पाच पुलांची रुंदी आणि उंची एकसमान नसल्याने नवीन पुलासाठी त्यांचा बळी द्यावा लागणार आहे. भूसंपादन आणि खर्च यातून मार्ग काढत सध्यातरी अखंड पूल अधांतरी असल्याचे जाणवते.

खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चिकलठाणा ते महावीर चौकापर्यंत सुमारे ८ किलोमीटरचा अखंड पूल बांधण्याची मागणी केली होती. गडकरी यांनी यासाठी होकार दर्शवला असून महिनाभरात पाहणीचे आदेश दिले. राष्ट्रीय महामार्गातील सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार अखंड पुलातील दोन अडथळे आहेत.

...तर पाच पूल जमीनदोस्त : जालना रोडवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बांधलेले पाच उड्डाणपूल आहेत. पैकी सेव्हन हिल्स आणि क्रांती चौक उड्डाणपूल महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहेत. सिडको बसस्थानक पुलासाठी ७२.४२ कोटी, सेव्हन हिल्स १०.७९ कोटी, मोंढा २८.७० कोटी, क्रांती चौक २२.८७ कोटी, तर महावीर चौक पुलासाठी ३४.९८ कोटी असा एकूण सुमारे १६९.७६ कोटी रुपयांचा खर्च आला. पाच पुलांच्या उताराचे भाग कापून उर्वरित अखंड पुलाला जोडण्याचे सुचवण्यात आले होते. मात्र, या पुलांची उंची वेगवेगळी आहे. रुंदीही ३५ ते ४२ मीटरदरम्यान आहे. नवीन पूल ४२ मीटरचा असणार आहे. यामुळे जुने पूल एकमेकांना जोडणे शक्य नाही. ते जमीनदोस्त करावे लागतील असे सूत्रांनी सांगितले.

भूसंपादनही कठीणच
राष्ट्रीय महामार्गाच्या निकषात पुलाच्या दोन्ही बाजूने पाण्याचा निचरा करण्यासारख्या सुविधांसाठी जास्तीची जागा लागते. सध्याच्या जागेत हे शक्य नसल्याने भूसंपादन करावे लागेल. पुलाखाली कोणालाच आपले दुकान नको असते. महापालिकेची आर्थिक स्थिती आणि व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेता भूसंपादन कठीण जाईल, असे सूत्र सांगतात.

विमानतळ पुलाचा अडसर
खा. इम्तियाज यांनी विमानतळासमोरील उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी गडकरींकडे केली होती. हाच उड्डाणपूल अखंड पुलातील पहिली अडचण ठरत आहे. सुमारे ७२ कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या ९०० मीटर लांबीच्या या पुलाला मंजुरी मिळाली असून हैदराबादच्या एका कंपनीला कंत्राटही मिळाले आहे. अखंड पुलासाठी हा पूल रद्द करावा लागेल. त्याबाबत राष्ट्रीय महामार्गाने दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना मत विचारले. त्यांचे उत्तर न आल्याने अखंड पुलाची दिशा ठरत नाही.

बातम्या आणखी आहेत...