आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:विमानतळ ते बाबा चाैक अखंड उड्डाणपुलासाठी गडकरींची संमती, खासदार इम्तियाज जलील यांची माहिती

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी दिल्लीत चर्चा करताना खासदार इम्तियाज जलील. - Divya Marathi
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी दिल्लीत चर्चा करताना खासदार इम्तियाज जलील.
  • राज्य, मनपाच्या सहकार्याची गरज : गडकरी

जालना राेडवरील वाहतुकीची काेंडी साेडवण्यासाठी चिकलठाणा विमानतळ ते बाबा पेट्राेल पंपापर्यंत अखंड उड्डाणपूल उभारण्यात यावा, या मागणीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संमती दर्शवली आहे. सध्या या रस्त्यावर असलेले उड्डाणपूल त्यासाठी जाेडावे लागतील. तज्ज्ञांचे पथक लवकरच शहरात येऊन त्याची पाहणी करेल. त्यांना एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश गडकरींनी दिले आहेत, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता विमानतळासमोरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम रद्द हाेणार आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, ‘दाेन दिवसांपूर्वी आमची दिल्लीत गडकरींसाेबत बैठक झाली. त्यात आम्ही हे मुद्दे मांडले. चिकलठाण्यातील विमानतळासमाेर एक उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र त्याचा फारसा उपयाेग हाेणार नसल्याने आकाशवाणी किंवा अमरप्रीत चाैकात ताे उभारावा, अशी मागणी आम्ही गडकरींसमाेर मांडली. तसेच पुणे, नाशिक, नागपूर, नगरच्या धर्तीवर औरंगाबादेत अखंड उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार का दुजाभाव करत आहे? असा प्रश्न आम्ही विचारला. त्यावर गडकरी म्हणाले, असा प्रस्ताव माझ्यापर्यंत कुणी आणलाच नाही. बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांकडे त्यांनी विचारणा केली असता या रस्त्यावर आधीच सिडकाे, सेव्हन हिल्स, माेंढा नाका, क्रांती चाैक या भागांत उड्डाणपूल असल्याचे सांगितले. हे छाेटे-छाेटे पूल जाेडून एकच अखंड उड्डाणपूल उभारता येईल का? असे गडकरींनी विचारले. बाबा चौक ते विमानतळ पूल शक्य नसेल तर क्रांती चौक ते केंब्रिज चाैकापर्यंत पूल उभारण्यात यावा, असा पर्यायही आम्ही गडकरींसमाेर मांडला. त्याची चाचपणी करण्याचे आदेशही गडकरींनी दिले.

सध्या जालना राेडवर असलेल्या सर्व पुलांचे दाेन्ही बाजूंचे उतार काढून टाकून ते अखंड पुलाला जाेडण्यात येतील. उड्डाणपूलाची रुंदी समान असणे आवश्यक आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून त्याची रुंदी, क्षमता व भविष्यात अडचण निर्माण होणार नाही याचे सर्वेक्षण केले जाईल, असेही इम्तियाज यांनी सांगितले.

शिवाजीनगर अंडरपासचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार
शिवाजीनगर रेल्वे गेटखाली अंडरपास उभारण्यासाठी राज्य सरकारने आधीच निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. आता रेल्वेच्या मंजुरीची गरज आहे. त्यासाठी मी रेल्वे बाेर्डाच्या अध्यक्षांचीही भेट घेतली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भागाचे नेते आहेत. त्यांनी लक्ष घातल्यास हे काम लवकर मार्गी लागेल. या कामात काही निधीची अडचण आली तर अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या मदतीने आम्ही ते काम पूर्ण करून घेऊ. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास विकासकामे लवकर मार्गी लागू शकतील, असे इम्तियाज म्हणाले.

राज्य, मनपाच्या सहकार्याची गरज : गडकरी
३० मीटर रुंदीचा अखंड उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्य शासन व महापालिका यांच्या मदतीचीही गरज भासणार आहे. भूसंपादन असाे की इतर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे. आम्ही निधी कमी पडू देणार नाही, असे गडकरींनी सांगितल्याचे इम्तियाज म्हणाले.

मंत्री डाॅ. कराड यांचाही अखंड पुलाला पाठिंबा
वाहतुकीची समस्या साेडवण्यासाठी आपण सर्वप्रथम नितीन गडकरींशी सविस्तर चर्चा केलेली आहे. याच वेळी मुकुंदवाडी, अमरप्रीत चौक व आकाशवाणी येथे उड्डाणपुल उभारण्याची शिफारस केली हाेती. आता जालना रस्त्यावरील रिकामी जागा पुलाने जोडून विमानतळ ते बाबा पेट्राेल पंप चाैक दरम्यान अखंड पूल हाेत असेल तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. याशिवाय नगर नाका ते कसाबखेडा रस्ता रुंदीकरण करून मुंबई, मालेगाव, मनमाड आणि वैजापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांची परवड थांबवण्यासाठीही आपण पाठपुरावा करत आहाेत. गडकरी यांनी या रस्ता रुंदीकरणास हिरवा कंदील दाखविला आहे. शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना सुलभतेने प्रवास करता यावा म्हणून एएस क्लब ते शिर्डी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आपण पाठपुरावा केला. या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती आता केली जात जात आहे. शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी सोमवारी (९ ऑगस्ट) गडकरींसाेबत आमची एक बैठक हाेणार आहे. त्यातही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...