आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबावर शोककळा:बहिणींना कंपनीत साेडायला जाताना दुचाकी ट्रकखाली; 3 भावंडांचा मृत्यू

वाळूज2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहिणींना कंपनीमध्ये सोडण्यासाठी दुचाकीवर ट्रिपलसीट जाणारा भाऊ आणि त्याच्या दोन बहिणींचा ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी ८.२० वाजेच्या सुमारास मॅन एनर्जी सोल्युशन कंपनीसमोर घडली. दीपक कचरू लोखंडे (२०) आणि त्याच्या बहिणी अनिता (२२) व निकिता ऊर्फ राणी (१८) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही रांजणगाव कमळापूर येथील रहिवासी आहेत.

मोठी बहीण अर्चनाचा टाहो...
डबा भरून ठेव, मी लगेच येतो म्हणत घेतला कायमचा निरोप

पाच बहिणींमध्ये एकुलता एक असणारा दीपक सर्वांचाच लाडका होता. त्याच्या जाण्याने आमच्या आयुष्यात कायमचा काळोख पसरला आहे. अनिता आणि निकिताने गुरुवारी पहाटे उठून घर आवरले. अनिताने स्वयंपाक केला. दोघींचे डबे भरून नाष्टा केला. दीपक दोघींना सोडण्यासाठी निघाला. ‘ताई, डबा भरून ठेव, मी लगेच येतो,’ असे म्हणून त्याने डबा भरला. पण तो पुन्हा परत आलाच नाही. त्याने जेवणही केले नव्हते.

माझ्या भावाने उपाशीच जगाचा निरोप घेतला. तो आमच्यासाठी घरच्या घरी एखादा उद्योग-व्यवसाय सुरू करून देणार होता. ‘पत्र्याच्या घरातून स्लॅबच्या घरात गेल्यावरच मी लग्न करेन, थोडे दिवस थांब, मग बघ, आपलीही परिस्थिती चांगली होईल,’ असे तो सांगायचा. बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तो खूपच मेहनत करत असे. त्यासाठी अनेक वेळा तो जास्तीची शारीरिक कष्टाची कामे अंगावर घ्यायचा. रात्री उशिरा झोपत असे.

त्यामुळे त्याला सकाळी लवकर उठवण्याची हिंमत माझ्याशिवाय कुणीच करत नव्हते. गरिबीची परिस्थिती असूनही तो मोठमोठी स्वप्ने पाहत असे. माझ्याशी तो मनमोकळेपणे बोलायचा. स्पोर्टबाइक घेण्यासाठी पैसे कमी पडल्यावर आईने त्याला पतसंस्थेतून कर्ज घेऊन रक्कम उभी करून दिली होती. कर्जाचे हप्ते तोच फेडायचा. एवढं सगळं करून खरेदी केलेल्या त्या सेकंडहँड गाडीवर बसून, “तू डबा भरून ठेव, मी लगेच परत येतो’ असे सांगून आमचा भाऊ दीपक आमच्यातून कायमचा निघून गेला. त्याच्या जाण्याने आमच्या आयुष्यात कायमचा काळोख पसरला आहे.

अपघातानंतर ट्रकचालक अजमत एमआयडीसी ठाण्यात आला शरण
अनिता व निकिता यांनी कंपनीत जाण्यासाठी तयारी केल्यानंतर दीपक त्यांना दुचाकीवर घेऊन निघाला. नांदेड येथून करोडीच्या ग्रीन गोल्ड कंपनीच्या गोडाऊनच्या दिशेने ट्रक (एमएच ०४, एफजे ५२८८) निघाला होता. ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने दीपक, अनिता आणि निकिता यांचा मृत्यू झाला. ट्रकचालक अजमत शेख हबीब शेखने (२६, रा. खंडाळा, ता. वैजापूर) एमआयडीसी पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली.

एकाच घरातील तिघांच्या मृत्यूमुळे लोखंडे कुटुंबावर शोककळा
एकाच वेळी घरातील तीन सदस्य गमावल्याने अतिशय बिकट परिस्थितीत जगणाऱ्या लोखंडे परिवारावर शोककळा पसरली. औरंगाबाद तालुक्यात राहणाऱ्या त्याच्या विवाहित दोन्ही बहिणींना माहिती मिळताच त्यांनी घाटीत धाव घेतली. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी तिघांचे मृतदेह नातेवाइकांकडे सोपवण्यात आले. रांजणगाव ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असणाऱ्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

घरातून निघताना दीपकने हेल्मेटही घातले नव्हते
दीपक लोखंडे दुचाकीवरून ट्रिपलसीट निघाला होता. त्यातच त्याने हेल्मेटही घातले नव्हते. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. वाळूज परिसरातील वाहनचालकांनी हेल्मेट घालूनच दुचाकी चालवावी, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...