आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण सोहळा:नाटकाचे अध्यात्म समजून घेत आयुष्याला अर्थ दिला : जगताप

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

‘माझ्या आयुष्याचे आकलन मी माणसांच्या नाट्यातून शोधले. समूहाचे प्रेम आवडत असल्यामुळे नाटकाकडे वळलो. प्रतिसृष्टी निर्माण करायची म्हणून कवी नव्हे, तर नाटककार झालो. नाटकाचे अध्यात्म समजून घेत आयुष्याला अर्थ दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार दिलीप जगताप यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार ‘भारतीय राज्य संस्था आणि सामाजिक न्याय’ या पुस्तकासाठी डॉ. प्रकाश पवार यांना आणि रंगभूमीवरील लक्षणीय कामगिरीसाठी ‘नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार’ ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप जगताप यांना रविवारी मसापच्या डॉ.ना.गो. नांदापूरकर सभागृहात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते पुरस्काराला उत्तर देताना बोलत होते.

या वेळी ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे उपस्थित होते. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश साळुंके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये अकरा हजार व स्मृतिचिन्ह प्रदान केले. वाईच्या रविवारपेठेत वाढल्यामुळे सर्व जातीधर्माच्या माणसांच्या सहवासात वाढलो. त्यांच्यात राहून ज्या धर्मात जात आहे, तो धर्म आपला नाही, अशी समज वाढीस लागली. वाईहून पुण्याला नाटक करण्यास गेलो. वयाच्या २४ वर्षी समीक्षकांची टीका वाट्याला आली. पण, हुरूप वाढवणाऱ्या अनेक घटना घडल्याने रंगभूमीवर सक्रिय राहिलो. लोटू पाटील ग्रामीण भागात रंगभूमी चालवलेले ७०-८० वर्षांपूर्वीचे वेडे रंगकर्मी होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, असेही जगताप म्हणाले. डॉ. नवनाथ तुपे यांनी डॉ. प्रकाश पवार यांच्या पुस्तकावर भाष्य केले.

बातम्या आणखी आहेत...