आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनिसेफ, राज्य शासनात सामंजस्य करार:5 विद्यापीठे करणार राज्यातील दुष्काळी भागांच्या जलस्त्रोतांचे संवर्धन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणी बचतीच्या जाणीव जागृती अभियानासाठी विद्यापीठाची निवड - Divya Marathi
पाणी बचतीच्या जाणीव जागृती अभियानासाठी विद्यापीठाची निवड

जलसंवर्धन व पाणी बचत अभियानात सक्रिय सहभाग घेण्यासाठी राज्यातील फक्त 5 विद्यापीठांची महाराष्ट्र शासनाने निवड केली आहे. युनिसेफ आणि राज्याच्या उच्च शिक्षण विभागांमध्ये त्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. पाणी बचत, नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन करण्याचे काम आता या पाच विद्यापीठातील विद्यार्थी करणार आहेत. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचाही त्यामध्ये समावेश आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत त्यावर उपाययोजना करण्याचे राज्य सरकारने सुनिश्चित केले आहे. त्यासाठी युनिसेफ आणि उच्चशिक्षण विभागाने 30 नोव्हेंबरपूर्वीच सामंजस्य करार केला आहे. मराठवाडा प्रदेश दुष्काळसदृश्य असतो. त्यामुळे मराठवाड्यातील दोन्ही अकृषी विद्यापीठांची निवड केली आहे. त्यात औरंगाबादचे डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठ, पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कोल्हापूरचे शिवाजी महाराज विद्यापीठाचीही निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, सातारा आणि बीड जिल्हे दुष्काळसदृश्य असल्याचे सरकारचे निरीक्षण आहे. म्हणून या भागातील विद्यापीठांत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील रासेयोचे स्वयंसेवक जलस्त्रोतांचे संवर्धन करणार आहेत.

शिवाय गावे आणि शहरांमध्ये जाऊन लोकांना पाणी बचतीचे महत्व सांगणार आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांची नोडल ऑफिसर म्हणून निवड केली आहे. युनिसेफने युसूफ कबीर यांना नोडल ऑफिसर केले आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले सल्लागार समितीचे सदस्य असतील.

आमच्या क्षेत्रातील तीन जिल्ह्यांत काम करू

युनिसेफच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या संकल्पासाठी आमच्या विद्यापीठाची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीन जिल्ह्यात रासेयोचे कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक-विद्यार्थी जलसंवर्धन आणि पाणीबचतीचे महत्त्व समजावून सांगतील. त्यात बीड, औरंगाबाद आणि जालन्याचा समावेश असेल-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

पुढील महिन्यात कृती आराखडा ठरेल

रासेयो राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे म्हणाले की, राज्यात 52 मोठ्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आहेत. पैकी फक्त 5 विद्यापीठांची निवड केली आहे. कारण मुंबई, पुणे आणि औरंगाबादेत सर्वाधिक रासेयोचे स्वयंसेवक आहेत. सध्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अधिकारी आणि मंत्री महोदय व्यस्त आहेत. बहुदा पुढील महिन्यात यासंदर्भात व्यापक बैठक होईल. त्यावेळी कृती आराखडा निश्चित होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...