आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:देवजना शिवारात अज्ञात तरुणांनी हदगाव आगाराची बस पेटवली,1 लाख रुपयांचे नुकसान

हिंगोली5 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर ते हदगाव मार्गावर देवजना शिवारात अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी (ता. १०) दुपारी तीन वाजता हदगाव आगाराच्या बसवर दगडफेक करून काचा फोडल्या त्यानंतर बस पेटवून दिली. या मध्ये बसचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव आगाराची हदगाव ते आखाडा बाळापूर हि बस देवजना, शेवाळा मार्गे आखाडा बाळापूर येथे येते. या बसच्या दिवसभरातून दोन फेऱ्या होत्या. त्यानंतर बस मुक्कामी हदगाव येथे जाते. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर बस (क्र.एमएच-४०-एन-९८०१) आखाडा बाळापूर येथून हदगाव कडे जात होती. यावेळी बसमध्ये १४ प्रवासी होते. सदर बस शेवाळा गावाच्या पुढे देवजना शिवारात आली असतांना अचानक बससमोर चौघे तरुण आले. त्यांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरवून बसवर दगडफेक केली. यामध्ये बसच्या समोरील व बाजूच्या काचा फुटल्या. त्यानंतर बसममध्ये पेट्रोल टाकून बस पेटवून देत तरुण तेथून निघून गेले. त्यानंतर चालक व वाहक व प्रवाशांनी आग विझवली. मात्र तो पर्यंत बसच्या चार ते पाच सीट जळून गेल्या होत्या.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, जमादार गजानन मुटकुळे, संजय मार्के, राजू जाधव, बाबुराव चव्हाण, राजू जमदाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बस आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणली. या प्रकरणात चालक बी. एम. सुरुशे यांच्या तक्रारीवरून चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दरम्यान, कळमनुरी बसस्थानकाचे स्थानक प्रमुख गजानन पिनगाळे यांनी आखाडा बाळापूर येथे भेट दिली आहे. या घटनेमध्ये बसच्या काचा फुटल्याने तसेच चार ते पाच सीट जळाल्याने सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser