आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरला विरोध करण्याचे केवळ नाटक करत आहेत. मतदारसंघातील नाराजी दूर व्हावी आणि व्होटबँक वाचावी यासाठीच त्यांनी साखळी उपोषण सुरू केले, असा आरोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (१२ मार्च) पत्रकार परिषदेत केला. मुस्लिम समाजाला त्यांचे हे नाटक चांगल्या प्रकारे कळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी आंदोलन बंद करून विकासासाठी एकजूट व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
नामांतरावरून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात डॉ. कराड यांना विचारले असता ते म्हणाले की, जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे व्हावे ही येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी असून ती केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केली आहे. त्यास विरोध करणे चुकीचे आहे. उद्योजकांनीही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन शहरातील शांतता भंग होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. यातूनच सर्व काही स्पष्ट होत आहे. ‘मी औरंगाबादेतच जन्मलो आणि औरंगाबादेतच मरणार,’ या खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर टोला लगावताना डाॅ. कराड म्हणाले की, जलील हे औरंगाबादेत जन्मले खरे, परंतु आता या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे.
त्यामुळे शेवटच्या दिवसांत त्यांना बिहारच्या औरंगाबादेतच जावे लागेल, तेव्हाच हे शक्य होईल. इथे राहिल्यास छत्रपती संभाजीनगर हेच नाव लागेल. मुस्लिम बांधवांचाही औरंगजेबाला विरोध होता, अशी टिप्पणी सहकारमंत्री अतुल सावे यांनी केली. या वेळी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शेंद्रा ऑरिक सिटीत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर मंजूर शेंद्रा येथील ऑरिक सिटीत इंटरनॅशनल कॅन्व्हेन्शन सेंटर व्हावेत अशी उद्योजकांची सातत्याची मागणी होती. त्याला मंजुरी मिळाली असून शासनाने ५० एकर जमीन नाममात्र शुल्कात दिली आहे. त्याचा डीपीआर लवकरच तयार करण्यात येईल, असेही डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. या वेळी डाॅ. कराड आणि अतुल सावे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातील शहर तसेच जिल्ह्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.