आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसांच्या वेतन आणि रिक्त जागांच्या भरतीसंबंधीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावून शिंदे, फडणवीस सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे रखडलेले शिक्षणाचे चक्र आता रुळावर आले आहे, अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्याचे महिला बालकल्याण विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची, तसेच रिक्त जागांच्या भरतीसंबंधीची विधिमंडळात घोषणा केली.
त्यानुसार राज्यातील अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपयांची वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन खरेदी करण्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुंबईत आंदोलन केले होते. या निर्णयाचा लाभ विशेषतः ग्रामीण भागातील बालकांना व कुटुंबांना होईल, असा विश्वास बोराळकर यांनी व्यक्त केला.
वयोमर्यादा वाढवून तरुणांना दिलासा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या सुमारे ६५ हजार रिक्त जागांपैकी ३० हजार जागा भरण्याचा निर्णय घेऊन गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रियाही सरकारने मार्गी लावली आहे. याबरोबरच ७५ हजार जागांवरील नोकरभरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून सरकारने युवकांच्या रोजगाराच्या संधी अधिक विस्तारल्या आहेत. या निर्णयामुळे लाखो बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे, असेही बोराळकर म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.