आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांना विद्यापीठाचा रेड कार्पेट:सुशोभिकरणानंतर शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांना निमंत्रण; सायन्स व्हॅन, इतिहास वस्तुसंग्रहालय, दाखवणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कँपस आता शैक्षणिक सहलीचे ठिकाण होणार आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले संपूर्ण परिसराला नयनरम्य स्वरूप देत आहेत. शिवाय विद्यापीठातील ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि ‘सायन्स ऑन व्हिल’ द्वारे विज्ञानाचे प्रयोगही विद्यार्थ्यांना दाखवले जाईल. प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. रमेश चौंढेकर यांना त्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्त केले आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी विद्यापीठ खर्चातून कोट्यावधींची (2013) सायन्स ‘व्हॅन’ घेतली होती. नंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात (2014-2019) विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त (23 ऑगस्ट) तीन दिवसीय ‘ओपन डे’ साजरा केला जायचा. त्यावेळी शहरातील शाळांना विद्यापीठात निमंत्रित करून ‘सायन्स व्हॅन’ मधील प्रयोग दाखवले जात असे. ‘ओपन डे’ला विज्ञान विभागांच्या भव्य प्रयोगशाळाही शालेय विद्यार्थ्यांच्या अवलोकनार्थ खुल्या केल्या जायच्या. आता ‘ओपन डे’ साजरा केला जात नाही. परंतु 15 जानेवारीपासून शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या सोयीनुसार विद्यापीठात निमंत्रित केले जाईल. त्यासाठी डॉ. येवलेंनी पत्र पाठवून शाळा निमंत्रित करणार आहेत.

प्रवेशद्वारापासून संपूर्ण कँपस दाखवला जाईल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुशोभिकरणाची कामे सुरू आहेत. एक महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. वाय पाइंटवरील बाबासाहेबांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे सेल्फि पाइंट म्हणून विकसित केले आहेत.

सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत कारंजे

कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी उद्यान स्वच्छ करून घेतले. तिथे कारंजे बसवण्यात येतील. सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत कारंजे सुरू राहतील. वनस्पतीशास्र विभागाची प्रयोगशाळा असलेल्या उद्यानातील जैवविविधता अनोख्या स्वरूपाची आहे. विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून दिली जाईल. शेजारच्या इतिहास वस्तुसंग्रहालयातील शिलालेख, प्राचीन व ऐतिहासिक वस्तुंचा खजिना विद्यार्थ्यांना पाहता येईल. येथे शुल्क आकारतात. पण शालेय विद्यार्थ्यांना मोफत करण्याचा डॉ. साखळे यांचा मानस आहे.

सोनेरी महल आणि औरंगाबाद लेणीचे ऐतिहासिक महत्व आणि लेण्यांतील तथागत बुद्धाचे शिल्प, स्तुप विद्यार्थी पाहतील. डॉ. चोंढेकर यांच्याकडे सायन्स व्हॅनचे काम सोपवले आहे. तद्वतच सहलींचे समन्वयकही त्यांनाच केले आहे. त्यांच्या टीममध्ये इतिहास, वनस्पती, ऍर्क्यालॉजी आणि तत्सम विषयांचे पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना गाईड करतील.

दहा दिवसांनी सुरू होईल चहल-पहल

प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे. लवकरच आम्ही टीम बनवून जबाबदारी निश्चित करू. विद्यार्थी त्यांचे जेवणाचे डबे आणतील. पिण्याचे पाणी आणि गाईडची व्यवस्था आम्ही करू. कुलगुरूंच्या अंतिम मंजूरीनंतर शाळांना पत्र दिले जातील. शालेय विद्यार्थी भविष्यात येथेच शिकण्यासाठी येतात. त्यासाठी या सहली महत्वाच्या भूमिका बजावू शकतात

- डॉ. भगवान साखळे, कुलसचिव

बातम्या आणखी आहेत...