आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाहतूक नियमाप्रमाणे जेथे रिक्षा स्टँड आहे तेथेच रिक्षा थांबायला हवी. मात्र, रस्त्यावर नागरिक जेथे उभा दिसला तेथे ऑटोरिक्षा थांबवली जाते. या वेळी मागील वाहनांचा विचार न करता प्रवासी बसवण्यासाठी रिक्षांची चढाओढ लागते. या बेशिस्तीमुळे मुख्य मार्गांसह अंतर्गत वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. काही वेळा अपघातही हाेतात.
शहरात ३५ हजारांवर ऑटोरिक्षा असून दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप, सिडको बसस्थानक ते रेल्वेस्टेशन, टी पाॅइंट ते सिडको, सिद्धार्थ गार्डन, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, जय भवानी चौक ते औरंगपुरा शहागंज, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, वाळूज, रांजणगाव, जुना मोंढा आदी मार्गांवर एखादी व्यक्ती, महिला, विद्यार्थी, पर्यटक कोणाची तरी प्रतीक्षा करत असेल किंवा सहज थांबला असेल तर त्यांना प्रवासी समजून ऑटोरिक्षाचालक त्याच्या दिशेने वेगात रिक्षा घेऊन येतात. या वेळी मागील वाहतुकीचा विचार केला जात नाही. प्रवासी मिळवण्यासाठी त्यांच्यात स्पर्धाच लागते.
मागचा ऑटो पुढे जाऊ नये म्हणूनही प्रयत्न असतो. तिसरा दोघांना कट मारून उभ्या व्यक्तीसमोर आडवी रिक्षा लावतो व कुठे जायचं? असे विचारून त्यांना बसण्याचाही आग्रह करतो. प्रवासीदेखील त्यांना हवे तेथे रिक्षा थांबवतात व उतरतात. यामुळे बेशिस्तपणाला खतपाणी मिळत आहे. मुख्य मार्गावर आहोत हे ते विसरतात. वाहतुकीस मोठा अडथळा होतो. वाहतूक ठप्प होते. कधी कधी किरकोळ तर कधी गंभीर अपघात होतात. याकडे आरटीओ पोलिस आणि मनपा प्रशासनाने लक्ष देऊन बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्याची गरज आहे.
दर्शक ठिकाणी फलक नाहीत
ऑटोरिक्षाचालक महासंघाकडे पोलिस, आरटीओ, मनपाने निश्चित करून दिलेले कागदोपत्री शहरात विविध दीडशे ठिकाणी रिक्षा स्टँड देण्यात आलेले आहेत. त्यापैकी सध्या १०० अस्तित्वात आहेत. ५० ठिकाणी अतिक्रमण आहे. येथे रिक्षा स्टँड असे दर्शक ठिकाणी कुठेही फलक लावलेले नाहीत. रिक्षा लाइनने उभ्या राहतात. ज्यांना रिक्षा स्टँडच माहिती नाही असे प्रवासी रस्त्यावर उभे राहतात.
नियम ताेडणाऱ्यावर कारवाई
दीडशे रिक्षा स्टँड दिले होते. त्यापैकी ५० स्टँडजवळ अतिक्रमण असल्याने तेथे रिक्षा उभ्या करता येत नाहीत. केली तर वाद होतो. त्यामुळे आणखी १५० स्टँडची गरज आहे. कुठेही रस्त्यावर ऑटोरिक्षा थांबवू नका. जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर पोलिस व आरटीओने कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनीच आदेश दिले आहेत. -निसार अहेमद खान, अध्यक्ष, ऑटोरिक्षाचालक संयुक्त कृती महासंघ.
शहरात फुटपाथचा अभाव : शहरात फुटपाथचा अभाव आहे. जेथे आहेत त्यावरून चालणे कठीण, अशी त्यांची दुरवस्था झाली आहे. तेथे हातगाड्या लावलेल्या असतात. अरुंद रस्ते, ऑटोरिक्षाचे थांबे निश्चित नाहीत. रस्त्याच्या आजूबाजूला वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.