आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावातावरणात अचानक बदल होऊन जालना, औरंगाबाद, नाशिक, नगर जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी मंगळवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ज्वारी, मका व गहू आडवा झाला. जालना जिल्ह्यात जानेफळ मिसाळ गावात मंगळवारी रात्री जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे गहू आणि ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औरंगाबादेतही संध्याकाळी गडगडाटी पावसाने हजेरी लावली. नाशिक-नगर जिल्ह्यातही पाऊस झाला.
आज ढगाळ वातावरण
राज्यात आज ढगाळ वातावरण राहील. अनेक जागी किमान तापमान २ ते २ अंश वाढले. ३० जानेवारीनंतर थंडी वाढण्याचा अंदाज तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला. २४-२५ तारखेला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस शक्य.
आज औरंगाबाद, बीडमध्ये पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. २५ जानेवारी रोजी बीड व औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
पिकाचे व्यवस्थापन करण्याचा दिला सल्ला
मका : लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट ५% ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करा.
रब्बी ज्वारी : फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे. गहू : कांडी धरण्याच्या अवस्थेत व पीक फुलावर असताना (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस) पाणी द्यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.