आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजा चिंतातुर:औरंगाबाद, जालन्यात ‘अवकाळी’ची हजेरी; मराठवाड्यातील पिकांवर नुकसानीचे ‘ढग’

परभणी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. - Divya Marathi
भोकरदन तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.

तापमानाचा पारा चढत असतानाच बुधवारी मराठवाड्यात ढगाळ वातावरण होते. तर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनके भागांत रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिके काढणीला आली आहेत. पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून पिकांचे नुकसान होते की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

याआधी खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता परत रब्बी हंगामातही पाऊस झाला तर हा हंगामही हातचा जातो की काय, अशी भीती व्यक्त हाेत आहे. बुधवारी अनेक भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह वारे वाहत हाेते. शिवाय सायंकाळच्या सुमारास वातावरण जास्तच खराब झाले होते. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, तूर ही पिके काढणीला आली आहेत. शिवाय अनेक भागात आंब्याला मोहर लागला आहे. त्यात आता हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस झाला तर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू शकते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जालना, आैरंगाबाद जिल्ह्यात पिकांचे नुकसान; आणखी दोन दिवस पावसाची शक्यता व्यक्त हवामान खात्याच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात सोमवारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची सुरुवात झाली. दरम्यान, दोन दिवसात काढणीस आलेले गहू तसेच ज्वारीचे पीक आडवे झाले. हरभरा, कांद्याला फटका बसला. सध्या रब्बी हंगामातील पिके काढणीवर आली असून शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. दुसरीकडे, आैरंगाबाद जिल्ह्यात सिल्लाेड, कन्नड, पैठण आदी तालुक्यांमध्ये गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले.

आंब्याला आलेला माेहर गळून पडण्याची व्यक्त होतेय भीती
तापमान वाढत असताना दिवसभर ढगाळ वातावरण का निर्माण होत आहे?

सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स, केरळमधील सायक्लोनिक सर्क्युलेशन व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

अशी स्थिती पुढे किती दिवस असेल ?
मराठवाड्यात गुरुवार, १० मार्च राेजी औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० किमी) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुढे सुमारे दोन ते तीन दिवस मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बदलत्या वातावरणाचा पिकांना कसा फटका बसेल?
ढगाळ वातावरण कायम राहिले व पाऊस झाल्यास फळबागांनाही फटका बसू शकतो. काढणीला आलेली गहू, तूर, ज्वारी, हरभरा, हळद आदी पिके भुईसपाट होऊन त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. त्यांची गुणवत्ता खराब होऊ शकते. त्याचबरोबर उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो.

पिके, फळबागांची काय काळजी घ्यावी?
काढणीस तयार हरभरा तसेच रब्बी ज्वारी पिकाची लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापणी केलेला गहू गोळा करून पॉलिथिन शीटने झाकून ठेवावा. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. हळदीची उघड्यावर साठवण करू नये. केळीच्या बागेत केळीचे झाड कोलमडू नये म्हणून झाडास आधार द्यावा.

बातम्या आणखी आहेत...