आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपलब्ध पाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवारी तीन कलमी कार्यक्रम जाहीर केला. त्यात चार विहिरींचे अधिग्रहण करून त्यातील पाणी काही वसाहतींना देण्याचे ठरले. त्यानुसार हिमायतबाग येथील शक्कर बावडीतील १५० ब्रास गाळ मंगळवारी काढण्यात आला. मात्र, याविरोधात एक याचिका दाखल झाली. त्यावर खंडपीठाने जैवविविधता राखण्यासाठी गाळ उपसा मोहिमेला स्थगिती दिली. पुढील आदेशापर्यंत काहीही करू नका, असे अंतरिम आदेश बुधवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, अनिल पानसरे यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांच्या नळ जोडणीला मीटर लावण्याचेही ठरवले होते. मात्र, उद्योगांना अनेक वर्षांपासून मीटर लागले असल्याचे उघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विहिरींचे पाणी लोकांना देणे, जलकुंभांमध्ये पाणी आणणाऱ्या वाहिनीवरील अवैध जोडणी तोडणे, हॉटेल तसेच व्यावसायिक संस्था-उद्योगांना वॉटर मीटर लावणे असा तीन कलमी कार्यक्रम हाती घेतला. ते कळताच ॲड. संदेश हांगे यांनी शक्कर बावडीप्रकरणी स्वत: (पार्टी इन पर्सन) याचिका दाखल करून न्यायालयात बाजू मांडली. पावसाळा सुरू झाल्यावर उपाययाेजना होत आहेत. २५ मे २०२२ रोजी अपर तहसीलदार विजय चव्हाण यांनी शक्कर बावडी, बैलगोठा बावडी, मोसंबी बावडी व दत्त मंदिर बावडीचे अधिग्रहण केले. १४ जून रोजी शक्करमधील गाळ काढणे सुरू झाले, असे त्यांनी याचिकेत मांडले. यंत्रकामासाठी पर्यावरण विभागाचा अहवाल आहे का? नवीन जलस्राेत तयार करण्याऐवजी हिमायतबागेतील ४०० वर्षांपूर्वीचे जलस्राेत का वापरायचे?, असा प्रश्न विचारत जैवविविधतापूर्ण भागात यंत्राने कामासाठी पर्यावरण विभागाचा अहवालही लागताे, असे याचिकेत म्हटले आहे. ५० वर्षांपेक्षा जुन्या झाडांना वारसा वृक्ष म्हणून दर्जा द्यावा, शक्कर बावडी व इतर विहिरी राज्य पुरातत्त्व विभागाकडे संवर्धनासाठी द्याव्यात, अशी विनंतीही करण्यात आली. या प्रकरणात केंद्राकडून ॲड. अजय तल्हार, शासनाकडून मुख्य सरकारी वकील ॲड. डी. आर. काळे, कृषी विद्यापीठाकडून अॅड. सत्यजित बोरा, मनपातर्फे ॲड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. १५० प्रजातींचे पक्षी, प्राण्यांना धोका परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मालकीच्या जागेत हिमायतबाग आहे. येथील पाणी उपशाने १५० प्रजातींचे पक्षी, प्राण्यांची जैवविविधता धोक्यात येऊन बागही सुकेल. अपर तहसीलदारांनी कुठल्या कारणासाठी चार विहिरींचे अधिग्रहण केले हा केंद्र व राज्य शासनाच्या अधिकारातील विषय आहे. पण उपशासाठी कुठल्याही प्रकारचे यंत्र येणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली. हिमायतबागेत ५० वर्षांपूर्वीच्या ८१३ वृक्षांचे ऑक्सिजन हब ३० विहिरी, त्यातील काही बुजल्या अॅड. हांगे यांनी म्हटले की, हिमायतबागेत ५० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असलेले ८१३ पुरातन वृक्ष आहेत. त्यांना वन विभाग, मनपानेही पुरातन वृक्ष म्हणून मान्यता दिली. अंब्रेला फाउंडेशनचाही यासंदर्भातील अहवाल मनपाकडे सादर केला आहे. या भागात ३० विहिरी असून त्यातील काही बुजल्या तर काहींचे अधिग्रहण केलेले आहे. या भागाला तत्काळ जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करण्यासाठी पावले उचलून चार आठवड्यांत अहवाल सादर करा, असा आदेश २३ फेब्रुवारी २०२२ रोजी खंडपीठाने दिला आहे. हा परिसर जैवविविधतेने नटलेला, वारसास्थळाचा भाग असून यंत्राने गाळ काढण्याने विहिरींना बाधा पोहचू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.