आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्त्व परीक्षेसाठी आर्थिक साहाय्य योजना

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाज्योती महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे

महात्मा जोतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या वतीने इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या गटातील उमेदवारांसाठी यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी परीक्षा-२०२१ साठी आर्थिक साहाय्य योजना सुरू करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना या योजनेअंतर्गत एकरकमी रक्कम रु. २५,००० आर्थिक मदत दिली जाईल. महाज्योती महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे. बहुजनांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी महाज्योतीची स्थापना ऑगस्ट २०१९ मध्ये करण्यात आली.

भारताच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे जनक, महात्मा जोतिबा फुले यांनी मागे पडलेल्या घटकांना मदतीचा हात देऊन त्यांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगती करून त्यांना योग्य ती मानवोचित प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. महाज्योती विविध योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या योजनांमधील पहिला प्रकल्प प्रशिक्षण व मार्गदर्शन, उत्कृष्ट तंत्रज्ञानाद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. परीक्षापूर्व प्रशिक्षण या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक आहे. हे प्रशिक्षण राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी, वैद्यकीय, पोलिस भरती, नागरी सेवा, वैमानिक अाणि इतर परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

गेल्या २२ फेब्रुवारी २०२१ पासून “महाज्योती’ने पोलिस भरती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नि:शुल्क ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विशेषत: ग्रामीण भागातून २ हजारांवर विद्यार्थी या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. याच मालिकेतील दुसरा घटक हा यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी परीक्षा-२०२१ साठी आर्थिक साहाय्य योजना आहे. या योजनेसाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच तो इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या गटातील असावा. तसेच उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्त्व चाचणी २०२१ साठी प्रात्र असावा.

अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी महाज्योती संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील Financial assistance for those who qualified for interview/personality test (UPSC) यावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत उमेदवारांनी जातीचा दाखला, डोमिसाइल प्रमाणपत्र व केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा मुख्य परीक्षा-२०२० चे प्रवेश पत्र ही कागदपत्रे स्वसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावीत. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या आर्थिक साहाय्यतेबद्दल ईमेलद्वारे कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी उमेदवार महाज्योतीच्या ७०६६८८८८४५ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

बातम्या आणखी आहेत...