आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्कर्ष पॅनलने वेगळीच रणनीती आखली आहे. आरक्षित प्रवर्गातील पाचपैकी फक्त चार उमेदवार घोषित केले आहेत. उर्वरित सहा जागांसाठी मात्र त्यांनी अद्याप पत्ते ओपन केले नाहीत. दोन दिवसांनी अधिकृत उमेदवारांंची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी सांगितले आहे.
उत्कर्षच्या उमेदवारांनी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी उत्कर्षचे नेते डॉ. मदन म्हणाले, ‘आम्ही महाविकास आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वरिष्ठ पातळीवरून त्याचे प्रयत्न सुरू आहेत. खुल्या गटातून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नामांकन मागे घेण्याची मुदत संपली तरी आम्ही आणखी दोन दिवसांनी अधिकृत उमेदवारांचे नावे जाहीर करू. तूर्त अनुसूचित जातीमधून प्रा. मगरे सुनील, अनुसूचित जमातीतून सुनील निकम, व्हीजेएनटीमधून दत्तात्रय भांगे, ओबीसीतून सुभाष राऊत आमचे उमेदवार असतील. महिला प्रवर्गातून मीनाक्षी शिंदे यांचे नामांकन अवैध झाले आहे. त्यांच्याऐवजी अन्य उमेदवार आम्ही शोधत आहोत. दरम्यान, सायंकाळी खंडपीठाने मीनाक्षी शिंदे यांना दिलासा दिला नाही. पत्रकार परिषदेला डॉ. नरेंद्र काळे, डॉ. राजेश करपे यांच्यासह उत्कर्षचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी अडचणीत : दरम्यान, युवा सेनेने स्वतंत्र शिवशाही पॅनल मैदानात उतरवल्याने महाविकास आघाडी होण्याची चिन्हे आता धूसर झाली आहेत. खुल्या प्रवर्गातून डॉ. नरेंद्र काळे, प्रा. हरिदास सोमवंशी, डॉ. भारत खैरनार, प्रा. रमेश भुतेकर, जहूर शेख यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. बीडच्या विजय पवार किंवा पंडित तुपे यांच्यापैकी एकाला उमेदवार करण्याची शक्यता आहे.
सर्व उमेदवार विजयी होण्याचा दावा
वसंतराव काळे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासात योगदान आहे. त्यांच्या प्रागतिक विचारांचा वारसा घेऊन दोन दशके विद्यापीठाच्या निवडणुका जिंकत आलो आहोत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण नेतृत्व करत आहेत. त्यामुळे ‘उत्कर्ष’चे सर्व दहा उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.