आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत लस टोचून घेतली. काहींच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना जाणवली, मात्र यातून पुढे संसर्गापासून आयुष्यभराची सुरक्षा मिळणार असल्याचा आत्मविश्वासही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला. विद्यार्थ्यांमधील हा उत्साह तरुणांनाही लाजवणारा ठरला.
हेल्पलाइनशी साधा संपर्क
शहरातील ५९ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली आहे. यात सहा ठिकाणी कोवॅक्सिन तर ४३ ठिकाणी कोविशील्ड लस देण्यात येणार आहे. दहा सेंटरवर रात्री १० वाजेपर्यंत लसीकरणाची सोय असेल. काही शंका असेल तर ९८५६३०६००७ हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले.
शाळा सजल्या; विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी साजरा केला लसोत्सव
बारावीत शिक्षण घेणारी श्रेया कुलकर्णी लसीची प्रतीक्षा करत होती. त्यासाठी तिने नोंदणीही केली होती. सोमवारपासून लसीकरण सुरू होणार म्हणून ती आनंदी होती. क्रांती चौकातील आरोग्य केंद्रात सकाळीच जाऊन पहिल्याच रांगेत लस घेण्यासाठी हजर झाली होती.
‘कुठलीही भीती न बाळगता मी लस घेतली. आता क्लासेसला जाताना अथवा बाहेर जाताना सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया तिने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. श्रेयाचे हे प्रातिनिधीक उदाहरण आहे. तिच्यासारख्या अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया आहेत.
१५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. मनपाच्या आरोग्य केंद्रांवर व शहरातील काही शाळांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली होती. शाळांचे वर्ग सजवले होते. डॉक्टरांनी व शिक्षकांनी वर्गात येऊन आधी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. कुटुंबीयांकडूनही त्यांना लसीचे महत्त्व पटवून सांगण्यात आले होते. त्यामुळे मुला-मुलींमध्ये उत्साह होता. कुठलीही भीती न बाळगता त्यांनी लस टोचून घेतली. इतकेच नव्हे तर अनेकांनी सेल्फी काढत लस घेतल्याचा आनंदोत्सव साजरा केला. हडकोतील एसबीओए शाळेच्या केंद्रावर पहिल्याच दिवशी ५३२ मुलांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. यात या शाळेतील ४९८ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
एन-११ येथील मनपा आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. रवी सावरे यांनी एक दिवस आधी शिक्षक, पालकांची ऑनलाइन बैठक घेऊन त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचेही समुपदेशन केले. परिचारिका प्रीती सोनवणे, मीना सूर्यतळ, योगिता भिसे, अलोकिता मगरे, मुख्याध्यापिका सुरेखा माने, शिक्षिका आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.
विद्यार्थी म्हणाले... आता भीती नाही, पण तरीही काळजी घेणारच
कोरोना लस घेण्याची उत्सुकता होतीच; पण भीतीही वाटत होती. मात्र लस घेतल्यानंतर सगळी भीती निघून गेली. लस घेण्यासाठी मी स्वत: कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन केले होते. - साक्षी शिंदे, विद्यार्थिनी.
माझ्या घरच्यांनी आधीच लस घेतली होती. मला कधी मिळणार अशी वाट पाहत होते. आज मी लस घेतल्याने खूप खुश आहे. आता आम्हाला क्लासला जातानाही सुरक्षित वाटेल. मात्र सर्व काळजी यापुढेही मी घेणार आहे. - पर्णिका मोरे
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर विद्यार्थिनींनी सेल्फी घेऊन आनंद साजरा केला.
शाळांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मुला-मुलींचा उत्साह कमालीचा होता. यापुढेदेखील ज्या शाळांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. मनपाकडून सुरू असलेले लसीकरण अगदी सुरक्षित आहे. घाबरण्याचे काहीही कारण नाही. - डॉ. रवी सावरे, प्रमुख, एन-११, आरोग्य केंद्र
एरवी बाहेर पडल्यानंतर क्लासमध्ये कुणाला सर्दी झाली, शिंकले तरी भीती वाटायची. मात्र आता भीती कमी झाली. - ऋषिकेश जोजारे
आम्ही निर्धास्त झालो आहोत. क्लासला जाण्यासाठी अडचण राहिलेली नाही. त्यामुळे प्रत्येक मुलाने लवकरात लवकर लसीकरणासाठी पुढे यावे.-शिफा शेख
शहरात १०६८ विद्यार्थी लसवंत
औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख १३ हजार ८२३ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. शहरात ही संख्या ६९ हजार ९९८ आहे. सोमवारी पहिल्या दिवशी औरंगाबाद शहरातील १,०६८ तर जिल्ह्यात एकूण ६,१९४ मुलांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतली. गेल्या वर्षी १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणास प्रारंभ झाला, पहिल्या दिवशी फक्त ३७१ जणांनीच लस घेतली होती. त्या तुलनेत विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.