आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:लसीचा काळाबाजार; आरोग्य सेवकास अटक, शासकीय कोट्यातील लस 300 रु. विक्री

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेमडेसिविर इंजेक्शनपाठाेपाठ आता काेराेना प्रतिबंधक लसींचाही काळाबाजार हाेत असल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबादपासून जवळच असलेल्या जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक गणेश रामदास दुरोळे हा शासकीय काेट्यातील कोविशील्ड लसींचे डाेस प्रत्येकी ३०० रुपयांत काही कामगारांना देत असल्याचे रांजणगाव शेणपुंजी येथे साेमवारी उघडकीस आले. याप्रकरणी आराेपी गणेशला अटक करण्यात आल्याची माहिती वाळूज एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. दरम्यान, आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांना चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रांजणगाव येथील शिवसैनिक निखिल कोळेकर यांना या गाेरखधंद्याची माहिती मिळताच त्यांनी आधी पक्षाच्या वरिष्ठांना व नंतर स्थानिक पाेलिसांना याबाबत माहिती दिली. त्याआधारे वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पाेलिस ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास साजापूर येथील एका घरात गेले. तेथून आरोग्य सेवक गणेश रामदास दुरोळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून लसींचा साठा, लसीकरण केलेल्या कामगारांची यादी व इतर साहित्य पोलिस उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांनी जप्त केले.

सध्या जिल्ह्यातील सर्वच सरकारी रुग्णालयात लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दिवसभर रांगा लावूनही लाेकांना डाेस मिळत नाहीत. तर दुसरीकडे औद्याेगिक वसाहतीतील कारखान्यांनी लसींचा दाेन डाेस घेतलेल्या कामगारांनाच कामावर येण्यास सांगितले आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्राथमिक आराेग्य केंद्रातील लसींचे काही डाेस गणेश कामगारांना प्रत्येकी ३०० रुपये घेऊन देत असल्याचे उघडकीस आले आहे. ठेकेदारांकडून कामगारांची यादी घेऊन, त्यांच्या आधार कार्डची नाेंदणी करुन लस दिली असल्याची कबुली गणेशने पाेलिसांकडे दिली आहे.

जिकठाणमधील दुसरा आराेग्य सेवकही ताब्यात
जिकठाण आरोग्य केंद्रातील दुसरा आरोग्य सेवक सय्यद अमजद सय्यद अहमद हा लसीचे डोस उपलब्ध करून देत असल्याचे आराेपी गणेशने सांगितले. त्यानुसार पाेलिसांनी सय्यद अमजदलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शासकीय काेट्यातील लसींचे डाेस काळ्याबाजारात विकणाऱ्या आराेपींना वरिष्ठ पातळीवरून आणखी काेणाचे सहकार्य हाेते का ? या अनागाेंदी कारभाराकडे आजवर वरिष्ठांचे लक्ष कसे गेले नाही? याबाबतही पाेलिस चाैकशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...