आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना कॅमेऱ्यात कैद:गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळले; वैजापूर तालुक्यातील घटना; दहा जण जखमी

वैजापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे एका दुकानाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रेक्षक बसलेल्या पत्र्याचे शेड कोसळून आठ ते दहा जण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.

बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री एका खासगी दुकानाच्या उद्घाटनासाठी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिला पाचारण करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे प्रेक्षक जागा मिळेल तेथे बसत होते. काही उत्साही प्रेक्षक एका दुकानावरील पत्र्याच्या शेडवर बसून नृत्याचा कार्यक्रम बघत होते.

गौतमीचा डान्स पाहण्यासाठी काही लोक एका पत्र्याच्या दुकानाच्या शेडवर उभे होते. गौतमीचा डान्स सुरू झाला. राती अर्ध्या राती हे गाणे सुरू होते आणि तेवढ्यात पत्र्याचे शेड कोसळले. शेडवर उभी असलेली लोकंही खाली कोसळली. या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या घटनेत काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. कार्यक्रम ऐन रंगात आला असताना या शेडवर बसणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. त्यामुळे प्रेक्षकांच्या वजनाने हे शेड कोसळले. यात आठ ते दहा जण जखमी झाल्याचे समजते. यावेळी एकच धांदल उडाली. यावेळी अनेक प्रेक्षकांनी येथून पळ काढला. त्यानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला. दरम्यान, या घटनेतील जखमींना उपचारसाठी दवाखान्यात दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अशी घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळे येथे पैलवान जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठी गर्दी जमली होती. डान्स सुरू असताना चाहत्यांनी गौतमी पाटीलच्या अदाकारीवर ठेका धरत कार्यक्रमात धुडगूस घातला. काही चाहते कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांवरती चढल्याने अनेक गाळ्यांचे पत्रे फुटले.