आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वज्रमूठ सभा मविआची:यशस्वितेसाठी उद्धव सेनेकडून 80 टक्के, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ 20 टक्के प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेची तयारी पाहणी करताना सुभाष देसाई. - Divya Marathi
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेची तयारी पाहणी करताना सुभाष देसाई.

महाविकास आघाडीतर्फे रविवारी (२ एप्रिल) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या वज्रमूठ सभेच्या आयोजनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी असले तरी सभेच्या यशस्वितेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून ८० टक्के प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. सभेच्या ठिकाणी स्तंभपूजन, सभेचे निमंत्रण, कामाची पाहणी, सोशल मीडियावर कॅम्पेनिंग या सर्व गोष्टींत उद्धव ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच आमदारांनी बंडखोरी करत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यातील दोघांना मंत्रिपददेखील मिळाले. त्याला उत्तर म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद याच शहरात देण्यात आले. त्यामुळे अजूनही उद्धव सेनेची संघटना कायम आहे. त्याच जाेरावर छत्रपती संभाजीनगरात वज्रमूठ सभेचे आयोजन केले आहे. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर उद्धव सेनेच्या आगामी वाटचालीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे उद्धव सेनेकडून सभेच्या यशस्वितेसाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. रविवारच्या सभेत उद्धव ठाकरे सर्वात शेवटी भाषण करतील. त्यांच्या आधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण होणार आहे.

निमंत्रण पत्रिकेवरही उद्धव ठाकरे गटच
जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांचे मोठे छायाचित्र वापरले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचेही मोठे छायाचित्र आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोध पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची लहान आकारातील छायाचित्रे निमंत्रण पत्रिकेवर छापली आहेत.

महाविकास आघाडीची पहिली सभा
या सभेसाठी उद्धव सेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, तर काँग्रेसकडून नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, खासदार रजनी पाटील यांची उपस्थिती असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे, खासदार फौजिया खान यांची उपस्थिती असणार आहे.

सावरकर, दंगलीविषयी काय भूमिका?
भाजपने सभेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे नियोजन केले आहे. उद्धव ठाकरे व इतर महाविकास आघाडीचे नेते याबाबत काय बोलतील, याशिवाय किराडपुरा राम मंदिरासमोर झालेल्या दंगलीबाबत ठाकरे काय भूमिका घेतील याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मविआची सभा विक्रमी होईल
सभेची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेचा सभेला येण्याचा उत्साह बघितला तर ही सभा मागच्या सभांचा रेकॉर्ड तोडेल. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून या सभेची तयारी करत आहेत. - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

‘राष्ट्रवादी’नेही मोर्चेबांधणी केली
राष्ट्रवादी काँग्रेसने सभेसाठी मागील काही दिवसांपासून बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मविआच्या सभेबाबत मोठा उत्साह आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह शहरातील विविध वॉर्डांतून राष्ट्रवादीचे, विशेष करून मुस्लिम समाजातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सामील होणार आहेत. - ख्वाजा शरफुद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पदाधिकारी, कार्यकर्ते येणार
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर समित्या तयार केल्या आहेत. जिल्हाभर व शहरात अनेक बैठका घेऊन त्याची तयारी केली आहे. या सभेविषयी जिल्हाभर उत्सुकता आहे. सभेसाठी जिल्हाभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत. ही सभा नक्कीच ऐतिहासिक ठरेल. - डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस