आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:धनंजय मुंडेंनी ज्यांच्याविरुद्ध रान पेटवले, त्या अधिकाऱ्यास त्यांच्याच मंत्रालयात बढती!

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • वंदना कोचुरे आता सामाजिक न्यायच्या प्रादेशिक उपायुक्त

विरोधी पक्षनेता असताना धनंजय मुंडे यांनी परभणीच्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्रमुख वंदना कोचुरे यांच्या निलंबनासाठी विधान परिषद दणाणून सोडली होती. मात्र, आता मुंडे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याच सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने कोचुरे यांना बढती दिली आहे. भ्रष्टाचाराच्या २ प्रकरणांत चौकशी सुरू असताना कोचुरेंना मंत्रालयात प्रादेशिक उपायुक्तपद दिले आहे.

फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी लक्षवेधी मांडली आणि कोचुरे यांच्या निलंबनासाठी मुंडेंसह विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासनही दिले. २१ जून आणि २ जुलै २०१९ रोजी यावर दुसऱ्यांदा सभागृहात वादळी चर्चा झाली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांनी वंदना कोचुरे आणि अन्य तीन अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले. सत्तांतरानंतर मुंडे समाजकल्याण मंत्री झाले. १८ ऑगस्टला कोचुरे यांना प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण (कोकण विभाग), मुंबई येथे बढती देण्यात आली. ज्या अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी रान पेटवले, त्यांनाच बढती दिल्याबद्दल विभागातील अधिकारी वर्गात आश्चर्य व्यक्त होत आहे.

दोन प्रकरणांत चौकशी
- परभणीत जात प्रमाणपत्रासाठी कोचुरे यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे लाच मागितल्याची तक्रार आली. आर्थिक गुन्हे शाखेने कोचुरे यांना तहसील कर्मचारी आणि एजंटासोबत आर्थिक लागेबांधे असल्याच्या दिशेने तपास केला. अटकेच्या भीतीने कोचुरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
- नाशकात उपायुक्त पदावर असताना कोरोनाकाळात बेकादेशीररीत्या साहित्य खरेदीचा ठपका त्यांच्यावर आहे.
- २०१३ मध्ये औरंगाबाद जिल्हा परिषदेत समाजकल्याण अधिकारी असताना त्यांच्यावर २०११ च्या अपंगांना सायकल वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला होता. यात त्यांना क्लीन चिट मिळाली.

सत्याची बाजू घेऊ
हे पद स्वीकारून तीन महिने झाले आहेत. या बदल्या त्यापूर्वीच्या आहेत. यामुळे या प्रकरणाबाबत सांगता येणार नाही. आमच्याकडे सातत्याने तक्रारी येत असतात. मी नेहमी सत्याची बाजू घेतो. कोचुरे यांच्याबाबत कागदपत्रे तपासून योग्य तो निर्णय घेऊ. - श्याम तागडे, प्रधान सचिव, समाजकल्याण विभाग.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser