आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिजामी राजवटीच्या विरोधात शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील तरुणांनी ‘वंदे मातरम’ घोषणा जिथे दिल्या होत्या तिथूनच निजाम राजवटीला सुरुंग लागल्याचा इतिहास आहे. त्याच ठिकाणी ‘वंदे मातरम’ सभागृह व्हावे अशी शहरातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे किलेअर्कला ‘वंदे मातरम’ सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला होता. ९ डिसेंबर रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ४० वर्षांनी या वास्तूचे लोकार्पण होत आहे.
इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना १९८२ दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजनही झाले होते. मात्र, वक्फ बोर्डाने या जागेवर हक्क सांगत न्यायालयीन लढाई सुरू करून खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भूमिपूजन होऊनही काम स्थगित करावे लागले होते. पण शहरातील संतकृपा प्रतिष्ठान, लष्कर-ए-शिवबा, वंदे मातरम आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी २८ वर्षे याच ठिकाणी सभागृह व्हावे म्हणून तीव्र लढा दिला होता.
कार्यकर्ते प्रत्येक हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी येथे येऊन राष्ट्रध्वज फडकवायचे. या कार्यकर्त्यांच्या स्वप्नातील ‘वंदे मातरम’ सभागृह प्रत्यक्ष आकारास येण्यास ४० वर्षे लागली. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला.
तिरंगा फडकवला म्हणून तणाव
मी पोलिसांना म्हणालो, ‘आम्ही तर देशाचा झेंडा फडकवतो आहोत.’ आम्ही पहाटेच्या अंधारात झेंडा लावायचे ठरवले. पण आमच्यापेक्षा दहापट पोलिस आले होते. मग आम्ही पळत जाऊन झेंडा फडकवला. नंतर आम्हाला अटक झाली. या अटकेने आमचा निश्चय अधिक प्रबळ होत गेला. -भाऊ सुरडकर, जिल्हाप्रमुख, वंदे मातरम सेना
हा जणू सोनियाचा दिनू
ज्या सभागृहासाठी आम्ही सातत्याने आंदोलने केलीत. सभागृह झालेले पाहता येणे हा आमच्यासाठी जणू सोनियाचा दिनूच आहे. ऐतिहासिक घटनेची नोंद घेणारी ही वास्तू आहे. त्यावेळच्या आंदोलनातील काही जण आता हयात नाहीत. पण सर्वांचे योगदान लक्षात येणारा हा क्षण आहे. -एकनाथ हिवाळे, लष्कर-ए-शिवबा
आज समाधान वाटतेय
पहिल्यांदा ‘वंदे मातरम’ घोषणा दिली गेली त्याजागी सभागृह व्हावे यासाठी आम्ही विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्रित लढलो. न्यायालयातील प्रकरण निपटल्यावर २००२ मध्ये एकदिवसीय उपोषणही केले होते. आज ही भव्य आणि दर्जेदार वास्तू आकाराला आली याचे समाधान वाटते. -सुभाष कुमावत, विश्व हिंदू परिषद
...तरीही आम्ही लढत राहिलो
वंदे मातरम सभागृहाच्या नियोजित जागी तिरंगा फडकवतो म्हणून आम्हाला पोलिस रोखायचे. आमच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करायचे. मात्र, आमचा निश्चय ढळला नाही. ८ वेळा अटक झाली. पण आम्ही लढत राहिलो. आज ४० वर्षांनी सभागृह अस्तित्वात आले त्याचा आनंद आहे -महेश दोरवट पाटील, संतकृपा प्रतिष्ठान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.