आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:सत्यनारायणासह वास्तुशांती, गृहप्रवेशाचा विधी आता ऑनलाइन, लवकरच संकेतस्थळावर पूजेची नोंदणी घेणार

औरंगाबाद / अभिजित वाटेगावकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तंत्रज्ञानाचा वापर करत गुरुजी सांगतात ऑनलाइन पूजा

कोरोनामुळे जगरहाटीच बदलली आहे. शाळा आणि कार्यालयीन कामेही ‘वर्क फ्रॉम होम’च्या टप्प्यात आली आहेत. यात आता पूजाविधी करणाऱ्या गुरुजींनीही नवी शक्कल लढवत सत्यनारायण, वास्तुशांती, गृहप्रवेश आणि अभिषेकासारख्या पूजाही औरंगाबादमध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. कोरोनामुळे रखडलेल्या पूजा ऑनलाइन सुरू झाल्याने ही आनंदवार्ताच म्हणावी लागेल.

औरंगाबाद येथील वेदमूर्ती सार्थक सुनील खोचे व श्रावण फडे यांनी आपल्या यजमानांना ऑनलाइन विधी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सार्थक खोचे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आमच्याकडे सत्यनारायण व इतर पूजा करण्यासाठी अनेकांकडून बोलावणे आले. मात्र, कोरोनामुळे कुठेही जाता आले नाही. त्यामुळे आम्ही ऑनलाइन विधी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आम्ही संकेतस्थळ सुरू करणार असून त्यावर सर्व प्रकारच्या विधींची माहिती देण्यात येणार असल्याचे खोचे यांनी सांगितले. सार्थक यांनी आचार्य श्री स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्याद्वारे संस्थापित महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान संचालित श्री सद्गुरू निजानंद महाराज विद्यालय, आळंदी येथे वेदमूर्ती श्री भगवान त्र्यंबकराव जोशी गुरुजी यांच्याकडे संहिता अध्ययन पूर्ण केले. याचबरोबर त्यांनी या क्षेत्रांमध्ये उच्च विद्या प्राप्त केली आहे.

सामाजिक भावनेतून विधी सुरू

सध्या अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे समाजाप्रति आपण काही देणे लागतो या भावनेतून ऑनलाइन विधी सुरू केले आहेत. त्यामुळे सध्या अमूक दक्षिणा पाहिजे यासाठी आमचा आग्रह नाही. सार्थक खोचे, वेदमूर्ती

यजमानांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न

कोरोनामुळे सध्या अनेकांना धार्मिक विधी करता येत नाहीत. त्यामुळे आम्ही ऑनलाइन विधी सांगून आमच्या यजमानांची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रावण फडे, वेदमूर्ती

असे सुरू आहेत विधी

लग्न समारंभ, सत्यनारायण, वास्तुशांती, गृहप्रवेश, अभिषेक, लघुरुद्र, सर्व प्रकारचे जप, सर्व प्रकारची अनुष्ठाने ई.

समाधान मिळाले : काही दिवसांपूर्वी आम्हाला घरी धार्मिक विधी करायचा होता. मात्र, गुरुजी मिळत नव्हते. ऑनलाइन विधीची माहिती मिळाली. त्यानुसार गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ऑनलाइन विधी केला. यामुळे काही प्रमाणात का होईना आत्मिक समाधान मिळाले. - संजय पांडे, शिवाजीनगर

0