आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आधार:वासुदेव आला आता वासुदेव आला... तुम्ही मात्र घरातच राहा! राेजगार नसलेल्या लाेककलावंतांना परभणी महानगरपालिकेचा आधार

औरंगाबाद / भारत दुधाटे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

“आपल्या हाताने हे जीवघेणे संकट ओढवू नका, बांधवांनो, घराबाहेर पडू नका, कोरोनाचा कहर झाला, वेठीस धरले महाराष्ट्राला, महाराष्ट्राने उच्चांक गाठला, लाजही सोडू नका, अरे बांधवांनाे, घराबाहेर पडू नका”

गोंधळ्याचे संबळ, वासुदेवाची टाळ-चिपळी, “वासुदेव आला हो वासुदेव आला’ असा घोष अन् सोबतीला भारूड आणि कोरोनाचं हे गाणं... दोन दिवसांपासून परभणीकरांची पहाट याच आवाजाने सुरू होते. लॉकडाऊन संपला आणि परभणीच्या गल्लोगल्ली सकाळी हेच आवाज घुमू लागले. हे गोंधळी, वासुदेव कोरोनावर बोलतात. कोरोनाची गाणी म्हणतात आणि लोकांना सांगतात, ‘लोकहो, संकट ओढवू नका, बांधवांनो, घराबाहेर पडू नका.’

इतक्यावरच हे थांबत नाहीत तर घराबाहेर त्यांना पाहायला आलेल्या प्रत्येकाला सॅनिटायझर देतात. मास्क का वापरायचा हे सांगतानाच कोरोनाविषयी जनजागृती करतात. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. दररोज घरोघरी जाऊन कमाई करणाऱ्या लोककलावंतांच्या नशिबीही तेच आले. अशा ५४ लोककलावंतांना परभणी महापालिकेने काम उपलब्ध करून दिले आहे. पालिकेने त्यांच्यावर केवळ जनजागृतीची जबाबदारीच सोपवली असे नाही तर त्यांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली आहे. त्यांना रोजचे ५०० रुपयांचे मानधनही दिले जातेय. लोकांना महापालिकेचा हा प्रयोग अभिनव तर वाटतोच आहे, शिवाय सकाळी येणारे वासुदेव, गोंधळी, लोककलावंतांमुळे त्यांची पहाट सकारात्मक होतेय.

असे आहे पथक : 54 लोककलावंत
30 गोंधळी
24 वासुदेव
500 प्रति दिवस मानधन
08 दिवस उपक्रम

अंगावर शहारे आले...
सकाळी-सकाळी गोंधळ्यांचा आवाज आला म्हणून मी घराबाहेर आलो, तर दोन गोंधळी तुणतुणे आणि संबळाच्या साहाय्याने अप्रतिम गायन करत होते. ते ज्या प्रकारे गात हाेते त्या गीताचे बाेल ऐकून अंगावर शहारे आले. - लक्ष्मीकांत रासवे, नागरिक

कलेला वाव मिळाला
या उपक्रमातून आमच्या कलेला वाव मिळाला. यासाठी आयकार्ड तसेच मानधन पण देऊ केले आहे. मनपाने आम्हाला ही जबाबदारी सोपली. तसेच आमच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली आहे. आम्हाला मास्क व सॅनिटायझरही दिले आहे. अशा उपक्रमासाठी महाराष्ट्रात कुठेही बोलावले तरी आम्ही जाऊ. -सुभाष शिर्के, गोंधळी, परभणी

स्थानिकांना राेजगार
काेराेनाकाळात लाेककलावंतांची रोजगाराची अडचण लक्षात घेत आम्ही प्रतिबंधविषयी जनजागृतीपर कार्यक्रमांची रूपरेषा आखून घेतली. यात ५४ कलावंतांचा समावेश करत आठवडाभराचा कार्यक्रम तयार केला. यातून राेजगार व जनजागृती दाेन्ही गाेष्टी प्रभावीपणे साध्य झाल्या. - देविदास पवार, आयुक्त मनपा.