आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांदा उत्पादकांपाठोपाठ आता भाजीपाला पिकवणारे शेतकरीही आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे वैतागले आहेत. हिंगोली जिल्ह्यात एका शेतकऱ्याने एक एकरवरील कोथिंबिरीच्या पिकावर तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने पाच एकर वावरात पिकवलेल्या कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरवला. कोथिंबीर आणि कोबी दोन्ही पिकांचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली.
कोथिंबिरीच्या काढणीसाठी २०० रु., विक्री प्रतिक्विंटल १०० रु.
हिंगोली जिल्ह्यात जवळा बुद्रुक (ता.सेनगाव) येथील शेतकरी नामदेव इंगोले आपल्या दोन एकर शेतीमध्ये पालक, टोमॅटो, कोथिंबीर आदी पिके घेतात. मात्र कोथिंबिरीच्या काढणीसाठी २०० रुपये मजुरी द्यावी लागते आहे. हिंगोली-रिसोडच्या बाजारात विक्रीचा दर प्रतिक्विंटल १०० रुपये मिळत असल्याने त्यांनी एक एकरवरील कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला. या वर्षी त्यांनी ४० दिवसांपूर्वी एक एकर क्षेत्रावर कोथिंबीर लावली. त्यासाठी २३० रुपये किलोप्रमाणे ४० किलो बियाणे खरेदी केले होते.
कोबीला १ किलोचा भाव
नाशिक | कोबीला किलोमागे एक रुपया भाव मिळत असल्याने बुधवारी अंबादास खैरे यांनी इगतपुरीतील पाडळी देशमुख येथील आपल्या ५ एकरांवरील कोबीवर नांगर फिरवला. ५ एकरांतील लागवडीसाठी अडीच लाख रुपये खर्च आला. मात्र आता कोसळलेल्या भावामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही, असे खैरे म्हणाले.
सोलापूर : ४ एकर कांद्यावर फिरवून टाकला रोटाव्हेटर
सोलापूर| जिल्ह्यातील कुरघोट या गावातील रेवणप्पा व्हनमाने या शेतकऱ्याने चार एकर कांदा पिकवण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च केले होते. मात्र आता किलोमागे चक्क ३ ते ४ रुपये भाव मिळत आहे. यामुळे व्यथित होऊन व्हनमाने यांनी ४ एकरमध्ये पिकवलेल्या कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला. वाहतूक, पोत्याचाही खर्च निघत नसल्याने आपण कांदा नष्ट केल्याचे व्हनमाने यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.