आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसयूव्हीला जास्त पसंती:दसऱ्याला गेल्या वर्षीपेक्षा वाहन विक्री 30% वाढली ; दिवाळीच्या मुहूर्तावर येणार गाड्या

औरंगाबाद / फेरोज सय्यद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे एकूणच बाजारपेठेची अवस्था बिकट होती. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीवरही त्याचा परिणाम झाला होता. पण आता संकट टळले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन विक्री सुमारे ३० टक्क्यांनी वाढली आहे. ग्राहकांची एसयूव्हीला (स्पोर्ट््स युटिलिटी व्हेइकल) जास्त पसंती आहे. मागणी जास्त पण सेमी कंडक्टरच्या अभावामुळे गाड्या कमीच उपलब्ध असल्याचे चित्र दिसून आले. मात्र, दिवाळीला सेमी कंडक्टरची अडचण दूर होईल, असे वितरकांनी सांगितले.

‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने मंगळवारी शहरातील दुचाकी, चारचाकी दालनांना भेटी दिल्या. तेव्हा असे समोर आले की, सहा महिन्यांपूर्वी बुकिंग करणाऱ्यांना चारचाकी मिळत आहेत. दुचाकीसाठी मात्र बुकिंगची गरज नाही. चारचाकीच्या किमती वर्षभरात २५ ते ५० हजार तर दुचाकी पाच हजार रुपयांनी वाढल्या आहेत. मात्र, त्याचा खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही.

दसरा, दिवाळीच्या निमित्ताने शहरात १५०० कार, १४ हजार दुचाकी विकल्या जाणार असल्याचा विविध शोरूमच्या व्यवस्थापकांनी अंदाज वर्तवला आहे. त्यातील एक हजार चारचाकी, तीन हजार दुचाकी दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकांच्या घरासमोर उभ्या राहतील. याशिवाय सुमारे ३ हजार दुचाकींची विक्री झाली. सेमी कंडक्टरची अडचण नसती तर दसऱ्याला मोठ्या प्रमाणात वाहन विक्री झाली असती. यंदा २०० पेक्षा अधिक एसयूव्ही विकल्या गेल्या. गेल्या वर्षी हे प्रमाण १५० होते.

दुचाकी बाजार उत्तम : यंदा दसऱ्याला विविध शोरूममधून किमान तीन हजार दुचाकींची विक्री झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दुचाकी बाजार उत्तम होता, असे पगारिया ऑटोचे व्यवस्थापक भावेश दोषी यांनी सांगितले.

१५० इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांचे बुकिंग
सध्या टाटा मोटार्सची इलेक्ट्रिक कार बाजारात आहे. या वर्षी १५० पेक्षा जास्त बुकिंग आहे. त्यापैकी ५० उपलब्ध झाल्या, अशी माहिती सान्या मोटर्सचे व्यवस्थापक संदीप चाटे यांनी दिली. इलेक्ट्रिकची दहा व्यावसायिक वाहने आणि रिक्षांचीही विक्री झाल्याचे उमरीकर मोटार्सचे मालक आनंद उमरीकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...