आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बडवे ग्रुप व एनआरबी संघाने विजय मिळवला. बडवे संघाने डीएगो संघावर 10 गडी राखून मात केली. या लढतीत सय्यद जावेद सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून बडवे संघाने क्षेत्ररक्षण स्विकारले. प्रथम फलंदाजी करताना डिएगो संघाचा डाव 17.1 षटकांत अवघ्या 58 धावांवर संपुष्टात आला. त्यांचे तीन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. सलामीवीर आदित्य राजपूतने 29 चेंडूंत 18 आणि सौरभ शिंदेने 20 चेंडूंत 1 षटकारासह 12 धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बडवेकडून सय्यद जावेदने 11 धावा देत 2 गडी बाद केले. ज्योतीबा विभुतेने 10 धावांत 2 बळी घेतले. अनिकेत काळे, जावेद चंद व पंकज चव्हाणने प्रत्येकी एकाला टिपले.
प्रत्युत्तरात, बडवे संघाने 4.5 षटकांत एकही गडी न गमावता विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर जावेद चंद 2 धावांवर नाबाद राहिला. त्याने जोरदार फटके बाजी करणाऱ्या अष्टपैलू सय्यद जावेदला खेळण्याची संधी दिली. दुसरा सलामीवीर सय्यद जावेदने 24 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 3 उत्तुंग षटकार खेचत नाबाद 55 धावांची विजयी खेळी केली. संघाने अवघ्या पाच षटकात हा सामना आपल्या नावे केला. सागर तोंड 2 षटकांत सर्वाधिक 28 धावा देत महागडा गोलंदाज ठरला.
रामेश्वर मतसागरची अष्टपैलू कामगिरी
दुसऱ्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या रामेश्वर मतसागरच्या (23 धावा, 4 बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एनआरबी संघाने काॅस्मो फिल्म्स संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. प्रथम खेळताना काॅस्मोने 20 षटकांत 8 बाद 112 धावा उभारल्या. यात ओंकार बिरोटेने 24, सतिश भुजंगेने 26 व भास्कर जिवरगने 24 धावा काढल्या. एनआरबीच्या रामेश्वर मतसागरने 13 धावा देत 4 फलंदाज तंबूत पाठवले. गौरव टेकाळेने 3 बळी घेतले. प्रत्युत्तरात एनआरबीने 10.1 षटकांत 3 गडी गमावत विजय साकारला. यात शुभम हरकळने सर्वाधिक 37 धावा काढल्या. सचिन शेडगेने 24 धावा जोडल्या. दिनेश पाटील 13 धावांवर नाबाद राहिला. अष्टपैलू रामेश्वर मतसागरने 15 चेंडूंत नाबाद 23 धावांची विजयी खेळी केली. कॉस्मोच्या महेंद्रने 2 गडी बाद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.