आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक आंतरशालेय चषक क्रिकेट स्पर्धा:वुडरिजने देवगिरी ग्लोबलला हरवले, पुर्वेश मिसाळ सामनावीर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत वुडरिज हायस्कूल अ संघाने शानदार विजय मिळवला. रोमांकच लढतीत वुडरिजने देवगिरी ग्लोबल स्कूलवर 12 धावांनी मात केली. या सामन्यात पुर्वेश मिसाळ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वुडरिजने 15 षटकांत 5 बाद 123 धावा उभारल्या. यात सलामीवीर मित पाटीलने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने 34 चेंडूंत 7 चौकार खेचत 40 धावा काढल्या. दुसरा सलामीवीर हर्षित जोशी 13 चेंडूंत 2 चौकारासह 11 धावांवर परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार हर्षल काळेने 28 चेंडूचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार खेचत सर्वाधिक 45 धावांची कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. हर्षित व मित जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. पार्थ मुंदडा 8 व अर्थव देशमुख 1 धावांवर बाद झाले. रिशित 4 धावांवर नाबाद राहिला. संघाला 14 धावा अतिरिक्त मिळाल्या. देवगिरीकडून हर्षराज सावंत, श्रीराज पलांडे, वरद जाधव, रितेश वानखेडे यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला. संस्कार मुथ्था २६ धावा देत महागडा गोलंदाज ठरला.

राघव नाईकचे अर्धशतक व्यर्थ :

प्रत्युत्तरात देवगिरी ग्लोबल स्कूल संघ निर्धारित षटकांत 6 गडी गमावत 111 धावा करु शकला. त्यांना 12 धावांनी पराभव स्विकारावा लागला. सलामीवीर राघव नाईकने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, संघाच्या पराभवामुळे त्याचे हे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याने 46 चेंडूंचा सामना करताना 8 सणसणीत चौकार खेचत नाबाद 59 धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. दुसरा सलामीवीर तथा कर्णधार हर्षराज सावंत अवघ्या 6 धावांवर रिशितचा बळी ठरला. त्यानंतर आलेल्या सशांक मुथाने 19 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. दोन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. आदित्य पवार (4), रिदम परमार (9) हे मोठी खेळी करु शकले नाहीत. वुडरिजकडून पुर्वेश मिसाळने 24 धावा देत 3 गडी बाद केले. निशाद जोशीने 2 आणि रिशितने 1 बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...