आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक टी-20 चषक:अजय शितोळेच्या शतकाने औरंगाबाद वकिल संघाने जिल्हा परिषद संघाला हरवले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत अजय शितोळेच्या (135) शतकाच्या जोरावर औरंगाबाद उच्चन्यायालय वकिल संघाने जिल्हा परिषद क्रिकेट संघावर 152 धावांनी मोठा विजय मिळवला. अजय शितोळेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर ज्ञानेश्वर पाटील अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेतन तेलंगदेखील 2 धावांवर आल्यापावली परतला. सलामीवीर अजय शितोळे व चौथ्या क्रमांकावर आलेल्या ऋषिकेश पवारने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. अजयने जोरदार फटकेबाजी करत शतक झळकावले. त्याने अवघ्या 59 चेंडूंचा सामना करताना 16 सणसणीत चौकार व 5 उत्तुंग षटकार खेचत 135 धावांचा पाऊस पाडला. त्याला साथ देत ऋषिकेश पवारने अर्धशतक ठोकले. अजय व ऋषिकेश जोडीने चौथ्या गड्यासाठी 164 धावांची भागीदारी रचली. ऋषिकेशने 41 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार लगावत 50 धावा काढल्या. मधुसुदन कलंत्री 7 धावा करू शकला. पवन इप्पर 10 धावांवर नाबाद राहिला. जिल्हा परिषदकडून श्रीवास्तव कुलकर्णीने 2 आणि संजय गिते, अमोल के. सचिन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरात, जिल्हा परिषद संघाचा डाव 16.2 षटकांत 9 बाद 87 धावांवर ढेपाळला. यात सलामीवीर सचिनने 12 व दुसरा सलामीवीर अरुण अल्हाडने 16 धावा केल्या. सय्यद आरिफने 23 व योगेश पाटीलने 14 धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा केला. एक फलंदाज अनुपस्थित राहिला. वकिल संघाकडून पवन इप्परने 3 आणि ज्ञानेश्वर पाटीलने 2 गडी बाद केले.

गुडइअर संघाची एनएचकेवर मात

दुसऱ्या लढतीत गुडइअर संघाने एनएचकेवर 114 धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम खेळताना गुडइअरने 20 षटकांत 2 बाद 170 धावा उभारल्या. यात सलामीवीर सलमान अहेमदने 54 व राहुल पाटीलने नाबाद 77धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात, एनएचके संघाचा डाव 14.1 षटकांत अवघ्या 56 धावांवर संपुष्टात आला. यात संग्राम परिहारच्या 16 धावा वगळता एकही फलंदाजाला दुहेरी आकाडा गाठता आला नाही. गुडइअरकडून सामनावीर ठरलेल्या जितू निकमने 4 गडी बाद केले. गणेश बोटे व शरद मलिकने प्रत्येकी 2 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...