आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धा:लकी क्लबचा विजय; एनके संघावर 6 गडी राखून मात, इम्रान पटेल ठरला सामनावीर

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टुल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत लकी क्रिकेट क्लबने विजय मिळवला. गुरुवारी झालेल्या सामन्यात लकी क्लबने एनके संघावर 6 गडी राखून मात केली. या सामन्यात इम्रान पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून लकी संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना एनके संघाने 20 षटकांत 8 बाद 178 असे आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात सलामीवीर प्रदिप जगदाळेने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 39 चेंडूंचा सामना करताना 9 सणसणीत चौकार व 3 उत्तुंग षटकार खेचत सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. मो. आमेरने अली चाऊसच्या हाती झेल बाद करत त्याची शतकाकडील वाटचाल रोखली.

दुसरा सलामीवीर आर्यन शेजुळने 10 धावा केल्या. खालिद जमानने 16 चेंडूंत 4 चौकारांसह 22 धावा ठोकल्या. अजय काळेने 20 चेंडूंत 19 धावा जोडल्या. तळातील फलंदाज कर्णधार वसिम खानने 15 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचत 19 धावा काढल्या. शुभम हरकळ 9, ऋषिकेश पवार 7, ऋषिकेश नायर 1 हे झटपट बाद झाले. लकी संघाकडून परवेझ खानने 27 धावा देत सर्वाधिक 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वाहबने 39 धावांत 2 बळी घेतले. मो. वसिम व मो. आमेरने प्रत्येकी एकाला टिपले.

इम्रान व खालेदची अर्धशतकी भागीदारी

प्रत्युत्तरात लकी क्लबने 19.5 षटकांत 4 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर इम्रान पटेलने अर्धशतक झळकावले. त्याने 45 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचत 67 धावा ठोकल्या. दुसरा सलामीवीर खालेद कादरीने 31 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार लगावत 35 धावा जोडल्या. खालेद व इम्रान जोडीने संघासाठी 59 चेंडूंत 89 धावांची अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर आलेल्या एस.के. आरिफने 15 धावांची विजयी खेळी केली. अमान शेखने 8 चेंडूत फटकेबाजी करत 4 षटकार खेचत 26 धावा कुटल्या. मो. वसिमने 13 धावांचे योगदान दिले. वसिम शेख 10 धावांवर नाबाद राहिला. एनके संघाकडून खालिद जमानने 2 आणि सय्यद सरफराज व ऋषिकेश पवारने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

बातम्या आणखी आहेत...