आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षीय उमेदवारांच्या बरोबरीने मते मिळवणारे सूर्यकांत विश्वासराव यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी आश्चर्यकारक आघाडी घेतली आहे. आपण विजयाच्या जवळ पोहोचलो असतो, मात्र सत्ताधाऱ्यांचा पैसा व संस्थाचालकांच्या धमक्यांमुळे आपला विजय दूर गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मराठवाडा शिक्षक संघटनेचा प्रभाव असाच राहिला तर पुढील निवडणुकीपर्यंत पक्षीय उमेदवारांसाठी मोठे आव्हान उभे केले आहे. सूर्यकांत विश्वासराव म्हणाले की, मराठवाड्यात शिक्षकांनी या वर्षी राजकीय पक्षाचा नाही तर शिक्षकांचा प्रतिनिधी पाठवण्याचे निश्चित केले होते. प्रचारात जुन्या पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या इतर मागण्यांना शिक्षकांनी कौल दिला.
दोन दिवस अगोदर फिरली सूत्रे : मतदानाच्या दोन दिवस आधी विश्वासराव यांनी सूत्रे फिरवण्यास सुरुवात केली. आपला विजय दिसू लागताच सत्ताधाऱ्यांनी व संस्थाचालकांनी शिक्षकांवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांना धमक्याही आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या धमक्या व दबावामुळे आपला निसटता पराभव झाल्याचे ते म्हणाले. प्रत्येक टेबलवर त्यांनी मते घेतली. भाजपचे उमेदवार किरण पाटील आणि विश्वासराव यांच्यात प्रत्येक फेरीत झुंज सुरू होती. पुढे तर कधी विश्वासराव मागे हे चित्र पाहायला मिळाले. विक्रम काळे पहिल्या फेरीतच सर्वत्र आघाडीवर होते. विश्वासराव यांनी १३५४३ मते घेतल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते ठरले. भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना १३४८९ मते मिळाली.
दरवर्षी नऊ हजार मते : गेल्या तीन निवडणुकांचा इतिहास बघितला तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यांच्या उमेदवारांना कायम आठ ते बारा हजार मतदान मिळते. पूर्वी वसंत काळे शिक्षक संघटनेेचेच उमेदवार होते. त्यानंतर या मतदारसंघावर पक्षीय वर्चस्व राहिले. विश्वासरावांच्या निमित्ताने ते चक्र पूर्ण होऊन या मतदारसंघाची सूत्रे पक्षांकडून शिक्षकांच्या हाती येण्यास प्रारंभ झाला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते गळाला लागूनही भाजपचे या वेळीही विजयाचे गणित हुकले
सतीश वैराळकर | औरंगाबाद
महाविकास आघाडीच्या आमदारांचा उजवा हात असलेल्या व्यक्तीसच आपल्याकडे खेचून दिलेली उमेदवारी, प्रचारासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांचा झालेला मेळावा, महाविकास आघाडीस सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या गोटात आलेले संस्थाचालक आमदार एवढ्या जमेच्या बाजू असूनही मराठवाडा शिक्षक मतदारसंघात भाजपच्या हाती निराशाच पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक मातब्बर नेत्यांना गळाला लावूनही भाजपच्या यशाचे गणित हुकले. भाजपने काँग्रेसमधील किरण नारायणराव पाटील यांना उमेदवारी देऊन मराठवाडा शिक्षक मतदारसंघात चुरस निर्माण केली. ५० हजारांच्या मतदारसंघात केवळ पंधरा हजार शिक्षकांची मतदार म्हणून केलेली नोंदणी भाजपसाठी पुरेशी ठरली नाही. राज्यात झालेले सत्तांतर आणि दिग्गज नेत्यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपत झालेल्या प्रवेशाचे रूपांतर विजयात करण्यात भाजपच्या हाती आलेली मोठी संधी व्यवस्थापनाअभावी गमवावी लागली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्याविरोधातील अँटी इन्कमबन्सी भाजपला कॅश करता आली नाही. ठोबळमानाने अनेक वर्षांपासूनच्या शिक्षकांशी संबंधित समस्या मविआ आणि महायुतीच्या सरकारला सोडवता आलेल्या नाहीत किंबहुना त्यासंबंधी गंभीरतेने घेतले गेले नाही. विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे प्रश्न, जुन्या पेन्शन योजनेबद्दल झालेल्या घोषणा-प्रतिघोषणा गोंधळाच्या ठरल्या.
शिक्षण संस्था असलेली दिग्गज मंडळी तरी...
भाजपकडे मराठवाड्यात शिक्षण संस्था असलेली दिग्गज मंडळी आहेत. अनेक नेतेमंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून डेरेदाखल झाली आहेत. त्यांच्या ताब्यात असलेल्या शिक्षण संस्थांच्या जाळ्यांचे रूपांतर मतदानात करणे भाजपला सहज शक्य होते. पदवीधरलादेखील याच गणितावर भाजपला आत्मविश्वास होता, तो शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही फोल ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.