आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:चोर असल्याचे समजून पकडलेल्या जीपमधे निघाला 2 लाख किमतीचा 23 पोते गुटखा

हिंगोली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पिंपळदरीच्या गावकऱ्यांच्या सतर्कतेने गुटखा तस्करीचा प्रयत्न फसला

कळमनुुरी तालुक्यातील नांदापूर मार्गाने भरधाव जीप पिंपळदरीकडे येत असून त्यात चोर असावे असा संदेश मिळताच पिंपळदरीचे गावकरी बसथांब्यावर एकत्र जमले. मात्र समोर गावकऱ्यांना पाहताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन वाहन खांबावर आदळले. गावकऱ्यांनी वाहनाकडे धाव घेऊन पाहणी केली असता त्यात 23 पोते गुटखा आढळून आला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. 8) कळमनुरी पोलिस ठाण्यात  पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कळमनुरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोर फिरत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावकरी रात्रीच्या वेळी पहारा देऊ लागले आहेत. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास नांदापूर रस्त्यावरून एक जीप भरधाव वेगाने पिंपळदरी मार्गे औंढा नागनाथकडे निघाली होती. नांदापूरच्या गावकऱ्यांनी जीप थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र जीपच्या वेगामुळे कोणाही पुढे आले नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने पिंपळदरीचे सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांच्याशी संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घोंगडे यांच्यासह सागर इंगोले, गणेश डुकरे, तातेराव शेळके, प्रभाकर स्वामी, नामदेव रिठ्ठे, संजय भुरके, विट्टल डुकरे, शेख छेटू, शेख गफ्फार, शेख इस्राईल, शेख खाजा, संभाजी डुकरे, गणेश पलटणकर, सचिन रिठ्ठे, सोनु रिठ्ठे यांच्यासह गावकरी बसथांब्या जवळ एकत्र आले.  यावेळी जीप बसथांब्याजवळ आली असतांना चालकास समोर गावकरी दिसले अन त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये जीप एका खांबावर जाऊन आदळली. त्यानंतर गावकऱ्यांनी जीपकडे धाव घेऊन पाहणी केली असता त्यात 23 पोते गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत 2 लाख रुपये आहे. या धावपळीत जीपमधील दोघे जण मात्र फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, जमादार शिंदे, सुर्यवंशी, सुनील रिठ्ठे, नलवार यांनी घटनास्थळी जाऊन जीप ताब्यात घेतली. या प्रकरणी सुनील रिट्ठे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी सद्दामखाँ पठाण, शेख शहाबुद्दीन शेख खाजा (रा. शिरडशहापुर, ता. औंढा), राम इंगळे (सिरसम, ता. हिंगोली), विठ्ठल गडदे, आनंद मामडे (रा. औंढा) यांच्या विरुध्द अन्नसुरक्षा मानके कायदा व  आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...