आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडमधील साखर कारखानदारांकडून नियमांचे उल्लंघन:कामगारांना 15 हजारांऐवजी केवळ 7500 रुपये वेतन; तक्रारीनंतरही कारवाई नाहीच

औरंगाबाद | संतोष देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड तालुक्यातील भवन माणिकनगर येथील सिद्धेश्वर कारखाना संचलित खडकपुर्णा अ‍ॅग्रो, स्टार केमिकल असवानी साखर कारखानदार शासन नियमांची सर्रास पायमल्ली करत आहे. संचालक विठ्ठल सज्जन बकले व शंकर राम माने यांनी 24 नोव्हेंबर 2022 रोजी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. कामगारांना अर्धे वेतन, कर, दुषित पाणी, करारातील अटीशर्तीचा भंग आदींबाबत त्यांनी माहिती देवून शासन नियमांचे उल्लंघन केले म्हणून कारवाईची मागणी केली होती. त्याची दखल अजूनही घेण्यात आलेली नाही.

दरम्यान, कामगारांना 15 हजारांऐवजी केवळ 7500 रुपये वेतन दिले. स्टॅम्प ड्यूटी व ग्रामपंचाय कराचा भरणा केला नाही. मळीचे दूषित पाण्याची व्हिलेवाट लावली नाही. दुर्गंधीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कारखान्यात 300 कामगार

असवानी साखर कारखान्यात सुमारे 300 कामगार काम करतात. त्यांना दर माह किमान पंधरा हजार रुपये वेतन देण्याचे आदेश कामगार आयुक्तांनी दिलेले आहेत. प्रकल्प संचालकांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवून फक्त साडेसात हजार रुपये म्हणजेच अर्धे वेतन देऊन काम करून घेतले जात आहे. या माध्यमातून कारखानदार कामगारांचे आर्थिक व मानसिक शोषण करत आहेत.

कामगारांना व परिसरात येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखाना परिसरात सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. काम करत असताना अपघात घडला तर प्राथमिक उपचाराची, सेप्टी किट बॉक्स जागोजागी बसवण्यात आलेले नाही. स्थानिक ग्रामपंचायतिचा कर भरणा केला नाही. सिद्धेश्वर कारखान्यासोबत केलेल्या करारातील अटीशर्तीचा खडकपूर्णा अ‍ॅग्रो व स्टार केमिकल असवानी सर्रास उल्लंघन करत आहेत.

स्टॅम्प ड्युटी भरणा नाही

25 फेब्रुवारी 2022 रोजी साखर आयुक्तांनी बजावलेल्या नोटीसनुसार 15 वर्षांच्या करारा संदर्भातील माहिती व शासन नियमानुसार स्टॅम्प ड्युटी भरणा केला नाही. तरी देखील राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे कारखाना सुरू करण्यात आला आहे.

मला माहिती नाही...

करार व समस्यांबाबत मला जास्त माहिती नाही. तुम्ही चेअरमन साहेबांना बोलावे. विश्वनाथ बहिर, एमडी, खडकपुर्णा अ‍ॅग्रो, स्टार केमिकल असवानी साखर कारखान, सिल्लोड.

तक्रारीबाबत मला माहिती नाही

आम्ही सर्व नियमांचे पालन करतो. कामगारांना कराराप्रमाणे वेतन दिले जाते. दोन संचालकाच्या तक्रारीबाबत मला माहिती नाही. स्टॅम्प ड्यूटी प्रकरण साखर आयुक्त विभागाकडूनच प्रलंबित पडले आहे. समाधान डोईफोडे, संचालक , सिद्धेश्वर संचलित खडकपुर्णा अ‍ॅग्रो, स्टार केमिकल असवानी साखर कारखान, सिल्लोड

बातम्या आणखी आहेत...