आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमात घुसखोरी:गॅदरिंगमध्ये धिंगाणा रोखणाऱ्या पालकावर टवाळखोरांचा हल्ला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या शाळेत स्नेहसंमेलनासाठी गेलेल्या वडिलांवर कार्यक्रमात घुसखोरी केलेल्या टवाळखोरांनी चाकूने हल्ला केला. ३१ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत कडुबा सूरचंद राठोड (३३) हे गंभीर जखमी झाले. बुधवारी ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या जबाबावरून सातारा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्रशांत सुधाकर साले (२३, सातारा) याला अटक केली, तर दुसरा अल्पवयीन असून तिसरा आरोपी फरार झाला आहे.

कडुबा यांची मुलगी व पुतणी हायस्कूलमध्ये शिकते. शाळेच्या स्नेहसंमेलनात कडुबा यांच्या मुलीनेही भाग घेतल्याने कडुबा त्यांच्या भावांसह शाळेत गेले होते. मात्र, मुलींचे सादरीकरण सुरू असतानाच काही टवाळखोरांनी धिंगाणा सुरू केला. त्यामुळे कडुबा यांनी त्यांना तुम्ही येथे असे करू नका, असे समजावून सांगितले. मात्र, अल्पवयीन आरोपी तसेच अक्षय नावाच्या टवाळखोराने त्यांना तेथेच मारहाण केली. स्नेहसंमेलन संपल्यानंतर कडुबा शाळेबाहेर पडले असता तिघांनी त्यांना अडवून पुन्हा मारहाण सुरू केली तसेच त्यांच्या पोटात चाकू खुपसला. यात कडुबा जागीच कोसळले. त्यानंतर आरोपींनी तेथून धूम ठोकली.

अट्टल गुन्हेगाराचा मेहुणा, पोलिसांकडून शोध सुरू
सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सर्जेराव सानप यांनी बुधवारी कडुबा शुद्धीवर येताच त्याच्याकडून आरोपींचे वर्णन घेत प्रशांतला अटक केली तसेच अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. मात्र, अक्षय नावाचा हल्लेखोर फरार झाला. तो एमपीडीएमधून बाहेर आलेल्या अजय ठाकूरचा मेहुणा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...