आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोली शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी, परस्पर तक्रारीवरून 41 जणांवर गुन्हा दाखल, शहरात वाढीव पोलिस बंदोबस्त

मंगेश शेवाळकर | हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुन्या भांडणाच्या कारणावरून झाली हाणामारी, शहर पोलिस ठाण्यात 41 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील रेल्वेस्टेशन रोड भागात जून्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी ता. २७ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून ४१ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सध्या शहरात वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात असून पोलिसांची गस्तही सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वेस्टेशन रोड भागातील प्रशांत पिल्ले व शेख इस्माईल यांच्यात मागील काही दिवसांत वाद सुरु होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्या कुरबुरी सुरुच होत्या. दरम्यान, शुक्रवारी ता. २७ हा वाद वाढल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. त्यानंतर काही वेळातच हाणामारी सुरु झाली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला.

या हाणामारीची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सय्यद अखील, उपनिरीक्षक प्रकाश कांबळे, नितीन केणेकर, डीबी पथकाचे शेख शकील, गजानन होळकर, सुधीर ठोंबरे, शेख मुजीब यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावर दंगाकाबू पथक देखील तैनात करण्यात आले होते.

या प्रकरणी प्रशांत पिल्ले यांच्या तक्रारीवरून शेख माजीद, आवेज खान, शेख जावेद, शेख अमीर, शेख अमजद, जुबेरखाँ पठाण, अकबर लोहार, शेख अनिस, असीफ पठाण, मुफ्ती फईम, शेख जायद व अन्य १५ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत पिल्ले, भुषण पिल्ले, संदीप पिल्ले, प्रदीप पिल्ले व इतर १० जणांवर दुकाची वाहनाची तोडफोड करून नुकसान केले तसेच मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून गस्त वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आज हिंगोली शहरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या सुचनाही दिल्या आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser