आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांच्या गर्दीत औरंगाबादची विठाबाई थेट झारखंडला; 6 महिने क्वॉरंटाइन सेंटरमध्ये मुक्काम, आता गावी परतणार

औरंगाबाद ( नामदेव खेडकर )14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भोळसर महिलेप्रति दोन जिल्हाधिकाऱ्यांची सहानुभूती; समन्वयाने लागला तपास, ओळखही पटवली

लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांची आपापल्या गावी जाण्याची लगबग सुरू होती. कुठून कशी तरी ६० वर्षीय भाेळसर विठाबाईही रेल्वेत मजुरांसोबत बसली अन् थेट झारखंडमध्ये उतरली. सहा महिने झाले तरी विठाबाई झारखंडमधील क्वाॅरंटाइन सेंटर सोडायला तयार होईना. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनीच विठाबाईंची माहिती काढली तेव्हा ती महाराष्ट्रातील औरंगाबादची असल्याचे लक्षात आले. त्यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला व ओळख पटवली.

आता औरंगाबाद येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने विठाबाईला परत आणण्यासाठी एक पथक झारखंडला रवाना झाले आहे. विठाबाई बाबूराव कुंबफळे (६०) ही महिला औरंगाबाद तालुक्यातील करमाडशेजारी असलेल्या कोळघर गावाची रहिवासी आहे. विठाबाईचे पती आणि मुलगा शेतमजुरी करतात. विठाबाई भोळसर असल्याने ती गावाच्या अवतीभवती फिरायची.

व्हिडिओ कॉलवरून ओळखले
खात्री पटावी म्हणून तलाठी अशोक काशीद यांनी लाटेहारच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना व्हिडिओ कॉल केला. पती, मुलगा व विठाबाई यांनी एकमेकांना ओळखले. विठाबाईच्या पतीची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना विठाबाईला झारखंडमध्ये जाऊन आणणे अशक्य असल्याचे लक्षात अाले. यामुळे जिल्हा प्रशासनाने स्वखर्चाने त्यांना आणण्याचा निर्णय घेतला. महसूल विभागाने एक चारचाकी गाडी भाड्याने घेऊन कोळघरचे सरपंच, पोलिस पाटील आणि विठाबाईच्या मुलाला गुरुवारी झारखंडकडे रवाना केले.

गर्दीत घुसली अन् झारखंडला पोहोचली
मे महिन्यात लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांसाठीची श्रमिक रेल्वे औरंगाबाद स्थानकावरून जाणार होती. करमाडमध्येही मजुरांची लगबग सुरू होती. त्या गर्दीत विठाबाईही मिसळली. तेथून बसमधून ती गर्दी रेल्वेस्थानकावर आली. गर्दीतच विठाबाई इतर मजुरांबरोबर रेल्वेत बसून झारखंडमध्ये आली. लाटेहार जिल्ह्यातील एका गुरुकुलमध्ये इतर मजुरांसोबत तीही क्वॉरंटाइन होती. मात्र, सहा महिने झाले तरी विठाबाईने क्वाॅरंटाइन सेंटर सोडले नाही.

असा लागला पत्ता : लाटेहारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विठाबाईची माहिती काढली. तिने औरंगाबादजवळ कोळघर हे गाव असून पैठण हे माहेर असल्याचे सांगितले. पतीचे व भावाचे नावही सांगितले, आडनाव सांगता आले नाही. यानंतर तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. विठाबाई या तब्बल सहा महिन्यांपासून गायब असल्याचे त्यांच्या पतीने सांगितले.