आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान झाले. औरंगाबाद विभाग, पुणे आणि नागपूर अशा पदवीधरच्या तीन आणि अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांसाठी आज मतदान झाले. 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया झाली. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजपशी थेट सामना होणार असल्याने या निवडणुकीबद्दल उत्सुकता आहे.
कुठे किती मतदान ?
कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 96 मतदारांनी मतदान केले होते. चार वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.52 टक्के तर शिक्षकसाठी 67.36 % मतदान झाले.
औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचे आव्हान आहे. भाजपचे बंडखोर उमदेवार रमेश पोकळे यांचा फटका कुणाला बसणार हे पाहावे लागणार आहे.औरंगाबाद पदवीधर मतदार संघात सुमारे 61 टक्के मतदान झाले.
नागपूर पदवीधर मतदारसंघात सायंकाळी 4 वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान झाले. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली.
शिक्षक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी अधिक
पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकात संध्याकाळी पाच पर्यंत 82.91 टक्के मतदान झाले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे.
धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 5 वाजेपर्यंत 99.31% मतदान झाले.
हे उमेदवार आहेत रिंगणात
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान पार पडले. आठही जिल्ह्यांमध्ये यंदा एकूण 3 लाख 74 हजार 45 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 813 मतदार केंद्रांवर निवडणूक पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बाेराळकर नशीब आजमावणार आहेत. गाेपीनाथ मुंडे यांचे समर्थक रमेश पाेकळे यांनी बंडखाेरी केल्याने निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पुणे येथील पदवीधर मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख,राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात लढत आहे. हे दोघेही सांगलीचे आहेत. या ठिकाणी संभाजी बिग्रेडचे श्रीमंत कोकाटे किती मते घेतात यावरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा.जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यात थेट लढत आहे. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात विद्यमान महापौर भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात तर अमरावती शिक्षक मतदारसंघात प्रा.श्रीकांत देशपांडे व भाजपचे डॉ.नितीन धांडे यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.