आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भयावह कोरोना:वेटिंग...बेडसाठी अन् सरणावरही; नांदेडमध्ये रुग्णालये फुल्ल, अंत्यसंस्कारालाही 1 दिवस वेटिंग

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोवर्धन घाट येथे शवदाहिन्या कमी पडल्याने काही जणांचे जमिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी बारा जणांना मुखाग्नी दिला.

रुग्णसंख्या वाढल्याने महसूल भवनात व्यवस्थानांदेड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. मागील काही दिवसांपासून दररोज हजारावर पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत आणि पाच ते दहा रुग्णांचा मृत्यू होत असल्याने अंत्यसंस्काराला स्मशानात एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णांना बेड मिळवण्यासाठी अक्षरश: पळापळ करावी लागत असून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्रशासनाने आता लॉज व इतर पर्याय खुले करणे सुरू केले आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ३६ हजार ५५५ वर पोहोचली आहे. मार्च महिन्यात आत्तापर्यंत जवळपास ८४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. नांदेड शहरात विविध समाजांच्या एकूण ८ स्मशानभूमी आहेत.

यात गोवर्धन घाट येथे मुख्य स्मशानभूमी असून येथे १२ शवदाहिनी आहेत. यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांसाठी सहा राखीव ठेवण्यात आल्या. उर्वरित सर्वसामान्यांसाठी आहेत. शांतिधाम सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा दिली जाते. परंंतु, मागील काही दिवसांपासून कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण वाढल्याने ही जागा अपुरी पडत आहे. अंत्यसंस्कारासाठी एक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. इतरांवरही याचा परिणाम होतो. कोरोनाने मृत झालेल्यांवर सिडकोमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिक विरोध करतात. त्यामुळे इतरांना जुना मोंढा येथील रामघाट, होळी येथील नावघाट व सिडको येथील स्मशानभूमीत पाठवावे लागते. गुरुवारी दुपारपर्यंत पाच जणांना या स्मशानभूमीत पाठवले होते. प्रसंगी कोरोनाने मृत झालेल्यांवर गोवर्धन घाट येथे जमिनीवरच अंत्यविधी उरकावा लागत आहे. महिनाभरापासून सकाळी ६ ते रात्री १० अंत्यसंस्कार होत आहेत. गुरुवारी दिवसभर १५ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे व्यवस्थापक नरसिंग गायकवाड यांनी सांगितले.

गुरुवारी १०५३ पॉझिटिव्ह रुग्ण, ९ जणांनी गमावला जीव

मनुष्यबळाचा अभाव
गोवर्धन घाट येथे शांतिधाम सेवा प्रतिष्ठानचे सात कर्मचारी कार्यरत आहेत. १४०० रुपये तुटपुंज्या मानधनावर ते कार्य करत आहेत. त्यांना कुठल्याही सुविधा नाहीत. शवदाहिनीत लाकडे टाकण्याचे काम हे कर्मचारी करतात. तर, महापालिकेचे कर्मचारी पीपीई किटमध्ये अंत्यविधीचे काम पूर्ण करतात. अंत्यविधीसाठी आलेल्या प्रत्येकावर सॉनिटायझरची फवारणी करण्यात येते. मृतांची संख्या पाहता मनुष्यबळाचा अभाव असल्याचे चित्र आहे. कोरोना मृतांची संख्या वाढल्याने येथे अजून अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कुठे किती बेड रिकामे
-विष्णुपुरी शासकीय महाविद्यालय ९
-जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २०
-शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात ४०
-दररोज हजारावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असून बेड मात्र अत्यंत कमी शिल्लक राहत असल्याचे चित्र आहे.

काही लॉज सुरू, ३०० बेडची उपलब्धता
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने गुरुवारपासून काही लाॅज सुरू केले आहेत. तसेच महसूल भवनमध्ये ३०० बेडची उपलब्धता करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...