आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीमारी से लडना है, बीमार से नहीं...:पॉझिटिव्हचा रिपाेर्ट देण्यास साडेतीन तास वेटिंग; नंतर म्हणे, बेड रिकामे नाहीत

औरंगाबाद (संजय चिंचोले)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पण बजाज रुग्णालयाचा बेजबाबदारपणा, स्वत: रुग्णाने फोन केल्यावरच सांगितले, ‘तुम्ही पॉझिटिव्ह आहात..!’

एका कंपनीतील कामगाराला १२ जूनला कोरोनाची लागण झाल्याने कंपनी व्यवस्थापनाने काही कर्मचाऱ्यांना तीन दिवस कामावर न येण्यास सांगितले. यात साताऱ्याच्या पृथ्वीनगरातील कामगाराचा समावेश होता. खोकला व अंगात थोडा ताप असल्याने त्यांनी कमलनयन बजाज रुग्णालयात तपासणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण रुग्णालयात फोन करून विचारेपर्यंत त्या व्यक्तीला रिपोर्टबद्दल माहिती दिली नाही. तत्पूर्वी स्वॅब घेण्यासाठीही साडेतीन तास बसवून ठेवल्याचा आरोप कोरोनाबाधिताच्या कुटुंबीयांनी व मित्रांनी केला.

तपासणीसाठी गेल्यापासून ते पॉझिटिव्ह ठरल्यानंतरही त्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे या व्यक्तीच्या आप्तांचे म्हणणे आहे. १३ रोजी तपासणी झाल्यानंतर रविवारी सायंकाळपर्यंत अहवाल मोबाइलवर कळवू, असे सांगितले गेले. पण सोमवारी सकाळी ९.३० पर्यंत मेसेज न आल्याने रुग्णानेच स्वत: रुग्णालयात लँडलाइनवर फोन केला. तेव्हा “आपण पॉझिटिव्ह आहात, तत्काळ रुग्णालयात या’ असे सांगण्यात आले. संबंधित रुग्ण मुलाला घेऊन दुचाकीवरच रुग्णालयात पोहोचला. पण बेडची व्यवस्था नसल्याचे सांगत इतर रुग्णालयात जाण्यास सांगितले. रिपोर्ट मागितल्यावर अपघात विभागाच्या ओपीडी कक्षात साडेतीन तास ताटकळत बसवले. साथरोग नियंत्रण कायद्यानुसार या रुग्णालय प्रशासनाने मनपा आरोग्य विभागालादेखील माहिती देण्याची तसदी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला.

रुग्णालयात पाणीही दिले नाही : रुग्णालयात अहवालाची प्रतीक्षा करताना संबंधिताला पाणीही दिले गेले नाही. मुलाने वडिलांना फोन करताच सर्व हकीगत कळली. तेव्हा मुलगा साताऱ्यातील माजी सरपंचाचा मुलगा राहुल शिरसाट व माजी ग्रामपंचायत सदस्य सरदार पद्मसिंह राजपूत यांना घेऊन रुग्णालयात गेला व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मात्र रुग्णालयाने बेड नसल्याची भूमिका कायम ठेवली. “दिव्य मराठी’ प्रतिनिधीला माहिती मिळाल्यानंतर मनपा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना कळवण्यात आले. अर्ध्या तासात बजाज रुग्णालयात मनपाचे कोविड-१९ कोरोनाविरोधी आरोग्य पथक दाखल झाले. संबंधित रुग्णाचा अहवाल देण्यासाठी पथकाला ४० मिनिटे ताटकळत ठेवण्यात आले. त्यानंतर रुग्णाला चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले व पृथ्वीनगर परिसरात औषध फवारणी करण्यात आली.

तत्काळ कारवाई करावी
कोरोनाबाबत मोठी रुग्णालये संवेदनशील नाहीत. उपचारासाठी व्यवस्था नसताना अहवालासाठी रुग्णाला साडेतीन तास का बसवून ठेवले? मनपाने तत्काळ या रुग्णालयावर कारवाई करावी. सरदार पद्मसिंह राजपूत, माजी ग्रामपंचायत सदस्य.

आंदोलन करणार
मनपाचे पथक दाखल झाल्यानंतरही ४० मिनिटांनी अहवाल दिले. पथकालाही वेठीस धरण्यात आले. या रुग्णालयावर मनपा आयुक्तांनी कारवाई न केल्यास सातारा-देवळाईकरांमार्फत तीव्र आंदोलन करणार आहोत. राहुल शिरसाट, समाजसेवक.

रुग्णालय नॉट रिचेबल
“दिव्य मराठी’ प्रतिनिधीने कमलनयन बजाज रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी अनिल गवई यांना संपर्क साधला. पण वरिष्ठांकडून सविस्तर माहिती घेऊन थोड्या वेळाने कळवतो, असे ते म्हणाले. नंतर वारंवार संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळू शकला नाही.

कुटुंब क्वाॅरंटाइन केले
बजाज रुग्णालयाच्या दिरंगाईमुळे रुग्णाची पत्नी, आई, मुलगा, मुलगी यांना क्वाॅरंटाइन करण्यास उशीर झाला. साताऱ्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब उनवणे यांनी त्यांना शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात हलवले.

कारवाईची दिशा ठरवू
हा रुग्ण आमच्या साखळीतील नसल्याने कल्पना नव्हती. या रुग्णाबाबत कळताच तातडीने पथक पाठवले. पृथ्वीनगर भागात औषध फवारणीही केली. रुग्णाच्या नातेवाइकांनाही क्वाॅरंटाइन केले आहे. माहिती घेऊन कारवाईची पुढील दिशा ठरवू. - डॉ. नीता पाडळकर, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.
पॉझिटिव्ह रुग्णाला रिपोर्टसाठी बजाज रुग्णालयात ताटकळत बसावे लागले.

बातम्या आणखी आहेत...