आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘वाँटेड’ आरोपींच्या नावाचा पोलिस ठाण्यासमोर झळकणार ‘फ्लेक्स’

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी पकडणाऱ्या पोलिस व नागरिकांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव होणार

आतापर्यंत तुम्ही केवळ नेत्यांचे, वाढदिवसांच्या शुभेच्छांचे किंवा जाहिरातींचे फ्लेक्स पाहिले असतील मात्र, आता बीड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांसमोर आता विविध गुन्ह्यात वाँटेड असलेल्या आणि फरार असलेल्या आरोपींच्या नावांचे फ्लेक्स झळकणार आहेत. शिवाय, या आरोपींना पकडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला रिवॉर्ड दिले जाईल तर, आरोपींची माहिती देणाऱ्या नागरिकांचाही पोलिस दलाकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.

नुकतीच जिल्हा पोलिस दलाची वार्षिक तपासणी पार पडली. यामध्ये आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलिसांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. गुरुवारी पोलिस अधीक्षक आर. राजा यांनीही जिल्ह्याची नियमित गुन्हे आढावा बैठक घेतली. यामध्येही वाँटेड आरोपींना पकडण्यासाठीच्या विशेष मोेहिमेबाबत रूपरेषा ठरवण्यात आली आहे.

वाँटेड असलेल्या आरोपींची संख्या सुमारे १ हजार ८०० असली तरी यातील काही आरोपी हे इतर जिल्ह्यातील आहेत तर काही आरोपी हे इतर राज्यांतील आहेत. मात्र, सध्या तरी जिल्ह्यातील आरोपींवर फोकस करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यात वाँटेड असलेल्या आरोपींची संख्या सुमारे १ हजार ५४ इतकी आहे तर, फरार घोषित करण्यात आलेल्यांची संख्या ११९ आहे. ८२ जणांविरोधात स्टॅडिंग वॉरंट आहे.या सगळ्या आरोपींच्या पत्त्यांनुसार ज्या ठाण्याच्या हद्दीत ते वास्तव्यात आहे तेथील ठाण्याला याची माहिती दिली गेली आहे. सर्व ठाण्यांना याबाबतच्या याद्या पाठवण्यात आल्या आहेत. या याद्यांचा फ्लेक्स तयार करून तो ठाण्यासमोर लावण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

सर्व ठाणेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत

वाँटेड, फरारी आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम पुढील काही दिवस हाती घेतली जात आहे. सर्व ठाणे प्रमुखांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आरोपी पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड दिले जाईल तर माहिती देणाऱ्या नागरिकांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. - आर. राजा, पोलिस अधीक्षक, बीड.

विशेष मोहीम राबवून आरोपींचा घेणार शोध

या मोहिमेत दररोज पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून आढावा घेतला जाणार आहे. १५ दिवसांत अधिकाधिक काम यातून करण्याचे उद्दिष्ट असून स्थानिक गुन्हे शाखेकडूनही विशेष मोहीम राबवून इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. - भारत राऊत, पीआय, एलसीबी

बातम्या आणखी आहेत...