आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत तालुक्यातील कनेरगाव येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात मुलीने सोमवारी ता. 19 रात्री उशीरा वसमत ग्रामीण पोलिसांकडे पुरवणी जवाब दिल्यानंतर आणखी 13 जणांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सदरील प्रकरण गांभीर्याने घेत आरोपींचा शोध सुरु केला आहे.
वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील एका मुलीचा एप्रिल 2021 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी ती मुलगी पाच महिन्याची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींनी घटस्फोट घेतला.
संबंधित प्रकरणात पीडीताने 10 जुलै रोजी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात मारोती उर्फ पप्पू भालेराव याच्याविरुध्द वसमत ग्रामीण पोलिसांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक करून त्याची चौकशी केली. त्यानंतर सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, त्या मुलीने सोमवारी ता. 19 रात्री उशीरा सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्याकडे पुरवणी जवाब दिला. त्यामध्ये 12 जणांनी तिच्यावर वेगवेगळ्या वेळी अत्याचार केल्याचे नमुद केले. तर एक महिलादेखील यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट केले.
पोलिसांनी पुरवणी जवाबानंतर संबंधित प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ केली आहे. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, जमादार गरूड, भुजंग कोकरे यांच्यासह पथकाने आरोपींची शोध मोहिम सुरु केली आहे.
घटनेच्या वेळी मुलगी अल्पवयीन
सदर मुलीवर अत्याचाराची घटना घडली त्यावेळी ती मुलगी अल्पवयीन होती. त्यानंतर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात तिचा विवाह झाला. मात्र काही दिवसांतच ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण चांगलेच गांभीर्याने घेतले असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके स्थापन केली आहे.
कुटुंबाला त्रास होईल या भितीने दिली नव्हती तक्रार
या प्रकरणात त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या 12 जणांपैकी 8 जण गावातीलच आहेत. त्यामुळे कुटुंबाला त्रास होईल या भितीने त्या मुलीने यापुर्वी त्यांच्या विरुध्द तक्रार दिली नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. तर एक जण वापटी तर एक जण अर्धापूर येथील कायम रहिवाशी असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. त्यांचादेखील शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.