आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.37 कोटीच्या बिलासाठी 8.5 लाखांची लाच घेणारा जलसंधारण अधिकारी अटकेत:औरंगाबादेत कार्यालयाच्या आवारातच सापळा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाचे १ कोटी ३७ लाख रुपये बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून साडेआठ लाख रुपयांची लाच घेणारा उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश प्रल्हादराव देशमुख (३४) याला सोमवारी अटक करण्यात आली. जलसंधारण कार्यालयाच्या आवारातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. देशमुख यास मदत करणारा लिपिक भाऊसाहेब दादाराव गोरे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणी जिल्ह्यातील गवळी पिंपळी (ता. सोनपेठ) येथील कामाचे १८ लाख रुपये व गोविंदपूर (ता. पूर्णा) येथील कामाचे १ कोटी १९ लाख अशी एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांची बिले काढण्यासाठी एक ठेकेदार जलसंधारण कार्यालयात चकरा मारत होता. वैजापूरचा उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश देशमुख याच्याकडे सध्या औरंगाबादचाही पदभार आहे. त्याने हे बिल काढण्यासाठी जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांना ७.५ टक्क्यांप्रमाणे ८ लाख ३ हजार २५ रुपये व आपल्याला ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यामुळे ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. पथकाने सोमवारी महामंडळाच्या कार्यालयात सापळा रचला. देशमुख आपल्या इनोव्हा कारमध्ये (एमएच २०/ एफजी ५००५) बसला. ठेकेदारालाही त्याने गाडीत बसवून ८ लाख ५३ हजार २५० रुपये घेतले. त्यानंतर तक्रारदाराने इशारा करताच पथकाने छापा टाकून देशमुखला पैशासह अटक केली. त्यानंतर लगेच एक पथक देशमुख यांच्या घराची झडती घेण्यासाठीही रवाना झाले.

खास जालन्याचे पथक
कारवाईची स्थानिक अधिकाऱ्यांना खबरबात लागू नये म्हणून एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी खास जालन्याचे पथक बोलावले होते. मागील वर्षभरातील औरंगाबाद एसीबीची ही सर्वात माेठी कारवाई आहे. अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप मुटेकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...