आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे यू टर्न:अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे औरंगाबादेत पाणीटंचाई, विद्या चव्हाण यांचा आरोप; शिवसेनेबाबत मौन

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१७-१८ या दोन वर्षांत झालेल्या जिल्हा संनियंत्रण समितीच्या जवळपास सर्वच बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबादेतील पाणीटंचाई आणि समांतर जलवाहिनी योजनेसाठी तत्कालीन शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना लक्ष्य केले होते. राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारीही तसाच सूर लावत होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना भागीदार झाले. त्यामुळे सूर बदलला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकारी टक्केवारी घेतात म्हणून पाण्याचे प्रश्न गंभीर झाला, असा आरोप केला. औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध असल्याचे खासदार प्रा. फौजिया खान यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हाध्यक्षाला ५०० सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीची आढावा बैठक गुरुवारी (२२ सप्टेंबर) राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडली. त्यात चव्हाण, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. खान, राज्य समन्वयक आशा मिरगे, जिल्हाध्यक्ष छाया जंगले, शहराध्यक्ष मेहराज पटेल आदींनी विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले.

२०१७-१८ मध्ये राष्ट्रवादीचेच आमदार सतीश चव्हाण यांनी पाणीप्रश्नी तत्कालीन शिवसेना खासदारांना केले होते लक्ष्य नामांतराला विरोधच : औरंगाबादच्या नामांतराबद्दल प्रा. फौजिया खान म्हणाल्या की, या नामांतराला आमचा विरोधच आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. विद्या चव्हाण यांनी सांगितले की, पक्षवाढीसाठी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना पाचशे सक्रिय सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यातून पाच हजार सदस्य तयार होतील.

केवळ घोषणा नको, पाणी योजनेला निधीही द्यावा : प्रा. खान

प्रा. खान यांनी सांगितले की, औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १६८० कोटींच्या महत्त्वाकांक्षी योजनेवरील खर्च तब्बल १ हजार कोटींनी वाढला आहे. आता २७०० कोटींवर गेलेली ही योजना केंद्र सरकारने अनुदानास पात्र ठरवली आहे. औरंगाबादच्या चिंतेचा विषय ठरलेली ही योजना मार्गी लागावी यासाठी अमृत टप्पा दोन मधूनही ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी नगरविकास विभागाने दाखवली आहे. मात्र, केवळ घोषणा देऊन चालणार नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सरकारला पाणी योजनेसाठी तत्परता दाखवावी लागेल. दोन ते तीन वर्षे नवीन योजनेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला लागणार आहे. यासाठी शासनाने योग्य पावले उचलण्याची गरज असल्याचे मत फौजिया खान यांनी व्यक्त केले. त्यावर शिवसेना दोन दशकापासून मनपात सत्तेत आहे. लोक पाणीटंचाईने त्रस्त आहेत, याला शिवसेना जबाबदार नाही का? त्यासाठी आपला पक्ष कधी आंदोलन का करत नाही, असा प्रश्न विचारला. तेव्हा विद्या चव्हाण यांनी प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. छाया जंगले यांनीही आम्ही पाणी प्रश्नावर आंदोलन करत असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...