आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मात्र, त्यात गेल्या १७ वर्षांपासूनचा पाणीटंचाईचाच मुद्दा लोकांसाठी महत्त्वाचा असेल, असे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (२ जून) मुंबईत पाणीपुरवठा योजनेची बैठक घेतली. मला कारणे सांगू नका. व्यवस्थित पाणीपुरवठा करा, असे फर्मावत १६८० कोटींच्या नव्या पाणी योजनेच्या ठेकेदाराला कारवाईचा इशाराही दिला. या योजनेचे १२ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्र्यांनीच भूमिपूजन केले होते. त्यानंतर ५३७ दिवसांनी त्यांनी योजनेचा आढावा घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून पाण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी तीन टप्प्यांत ३५ कलमी कार्यक्रम जाहीर केला. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी १० एमएलडी पाणी वाढवण्याचे निर्देश दिले. त्याचे काहीही झाले नाही. लाखो लोक तहानलेलेच आहेत. या साऱ्याचा परिणाम ८ जूनच्या सभेवर होऊ नये, असा प्रश्न शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी आढावा बैठक झाली. त्यात पालकमंत्री देसाईही उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी लक्ष घालावे. नव्या पाणी योजनेत हलगर्जीपणा दाखविल्यास जेव्हीपीआर या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल. ठेकेदाराकडून हमीपत्र घ्या. कालबद्ध वेळापत्रक तयार करा. योजनेचा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून नियमितपणे आढावा घ्यावा, अशीही सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पांडेय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
केंद्रीय वन विभागाकडे अजून प्रस्तावच पाठवला नाही नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्राशी संबंधित परवानग्या मिळवल्या, असे दावे सरकारकडून केले जात होते. वस्तुस्थिती तशी नाही. कारण, योजनेचा काही भाग जायकवाडीत असल्याने केंद्रीय वन विभागाची परवानगीसाठी केंद्राकडे तातडीने प्रस्ताव पाठवा, असे गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माझ्या कावडीने पाणी येत असेल तर.... ‘मला विकासकामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करून कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय. आता आम्ही फक्त घोषणा करणार नाही. माझ्या कावडीने जर कोणाच्या घरात पाणी येत असेल, त्यांची तहान भागत असेल तर ते मोठं पुण्य आहे आणि ते मिळवायला भाग्य लागतं.’ कोण म्हणाले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केव्हा, कुठे : १२ डिसेंबर २०२०, गरवारे स्टेडियम निमित्त : नव्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
किमान तीन वर्षे पुरेसे पाणी अशक्यच मुख्यमंत्र्यांनी फर्मान काढले तरी किमान तीन वर्षे औरंगाबादेतील प्रत्येक घरात पुरेसे पाणी मिळणे अशक्य आहे, असे या प्रश्नाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, शहराला दररोज किमान २२५ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी लागते. प्रत्यक्षात १०० एमएलडी येते. १२५ एमएलडीचा तुटवडा दूर करण्यासाठी २४०० मिमी व्यासाची जलवाहिनी हवी. ६ पंपिंग स्टेशन्स लागतील. ५६ जलकुंभ हवेत. या सर्व कामांसाठी किमान ३ वर्षे लागणार आहेत. ‘त्या’ आश्वासनांचेही पाणी पाणी तीन आठवड्यांपूर्वी पालकमंत्री, मनपा प्रशासकांनी १० एमएलडी पाणी वाढवण्याचे आश्वासन दिले. त्यापैकी हर्सूल येथील जलवाहिनी योजना पूर्ण झाली नाही. गारखेड्यात १८०० मीटर पाइप टाकण्यात आला नाही. विहिरींतील पाणी वापर सुरू झाला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.